दौंड मध्ये धारावी पॅटर्नची घोषणा हवेतच विरली! जिल्हाधिकारी साहेबांच्या सूचनेचा दौंड प्रशासनाला विसर



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

शहरातील कोरोना संसर्गाची साखळी तुटत नसल्याने बाधित रुग्णांची संख्या रोज वाढतच आहे. आणि ही साखळी तुटावी म्हणून येथील उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका आणि पोलीस प्रशासन उपाय योजनांची अंमलबजावणी करीत आहे. मात्र तरीही प्रशासनाला हवे तसे अपेक्षित यश मिळत नसल्याचे दिसत आहे. 

शहरातील वाढती रुग्णसंख्या आणि येथील शासकीय अधिकाऱ्यांनाच झालेली कोरोनाची लागण या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी येथे आढावा बैठका घेऊन उपाय योजनांबाबत मार्गदर्शन व काही  महत्वाच्या सूचना केलेल्या होत्या, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना बैठकी नंतरच हवेत विरल्या असल्याचा अनुभव दौंडकरांना येत आहे. जिल्हाधिकारी देशमुख यांनी स्वतः शहरातील प्रतिबंधित क्षेत्रास भेट देऊन शहरात व विशेषतः येथील झोपडपट्टी प्रभागांमध्ये धारावी पॅटर्न राबविण्या संदर्भात सूचना केलेल्या होत्या परंतु आजतागायत शहरात कुठेही असा कुठलाही पॅटर्न प्रशासनाने राबविल्याचे दिसून येत नाही.

आशिया खंडात सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी (मुंबई) मध्ये तेथील प्रशासनाने कोरोनावर नियंत्रण  मिळविले. तेथील प्रशासनाने झोपडपट्टीमधील प्रत्येक घरात जाऊन प्रत्येकाची आरोग्य तपासणी केली. औषध फवारणी सारख्या उपाय योजना राबविल्या त्यामुळे त्यांना यश मिळाले ज्याची दखल जागतिक आरोग्य संघटनेला घ्यावी लागली. आपल्या शहरात मात्र रुग्ण संख्येने कहर केला असताना सुद्धा येथील एकाही प्रभागात प्रशासनाच्या वतीने आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आलेली नाही. मग कोरोनावर नियंत्रण मिळणार कसे? आणि अशी सर्व परिस्थिती दिसत असतानाही कमीत कमी झोपडपट्टी प्रभागात तरी आरोग्य तपासणी व्हावी अशी मागणी कोणी नगरसेवक सुद्धा करीत नाही ही  अत्यंत खेदाची ची बाब आहे. 

कोरोना वर नियंत्रण मिळविण्यासाठी नगरपालिकेने ज्या उपाय योजनांना प्राधान्य दिले पाहिजे ते सोडून नगरपालिका शहरात दंड वसुलीला प्राधान्य देण्यात मश्गुल आहे, हे त्याहून जास्त खेदजनक आहे. शहरात शहरात विना मास्क फिरणाऱ्या तसेच बाजारपेठेत सुरक्षित अंतर न पाळणाऱ्या बेजबाबदार नागरिकांकडून दंड वसुली केलीच पाहिजे हे योग्यही  आहे मात्र फक्त दण्ड वसुली करून शहरातील कोरोना संपणार नाही हेसुद्धा  नगरपालिकेने लक्षात घेतले पाहिजे. दंड वसुली ला वेळ देण्या बरोबरच प्रतिबंधित क्षेत्र व झोपडपट्टी प्रभागात वेळ देऊन आरोग्य तपासणी मोहीम राबवून छोट्या  आजाराचे रुग्ण आढळल्यास त्यांना वेळीच सरकारी औषधे देऊन शहरा पुढील धोका टाळण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावा अशी अपेक्षा दौंडकरांकडून व्यक्त होत आहे.

शहरातून बाधीत पेशंट बेपत्ता!

दि.7 सप्टेंबर रोजी च्या अहवालात गोपाळवाडी रोड परिसरातील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उपजिल्हा  रुग्णालयाच्या वतीने तसे नगरपालिकेला कळविण्यात आले. तपासणी वेळी महिलेने दिलेला पत्ता फक्त गोपाळवाडी रोड असा अर्धवट असल्यामुळे दि.10 पर्यंत या बाधित महिलेचा शोध नगरपालिकेला लागलेला नाही. अशा अत्यंत गंभीर घटना जर शहरात घडत असतील तर परिस्थिती नियंत्रणात येणार कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा गंभीर गोष्टीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.