मुंबई : सहकारनामा ऑनलाईन
पोलीस खात्यातील काही IPS पोलीस अधिकारी हे महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्यावेळी आम्ही सतर्क राहून हा प्रयत्न वेळीच हाणून पाडला असा धक्कादायक गौप्यस्फोट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
मात्र या घडलेल्या प्रकारावर आता आपण काही बोलू इच्छित नाही असे म्हणत त्यांनी या प्रकरणाशी संबंधित त्या अधिकाऱ्यांविषयी आपली जाहीर नाराजीही व्यक्त केली .याबाबत एका वृत्तवाहिनीने त्यांची मुलाखत घेतली आहे त्यामध्ये गृहमंत्र्यांनी हि धक्कादायक माहिती दिली आहे.
या मुलाखतीमध्ये ज्यावेळी त्यांना सरकार पाडण्याचा पोलीस खात्यातर्फे जोरदार प्रयत्न झाल्याची चर्चा होत आहे ते खरे आहे का आणि असेल तर नेमके ते प्रकरण काय आहे आणि यामध्ये कोण कोण सहभागी आहेत असा प्रश्न त्यांना विचारला गेला त्यावेळी गृहमंत्री म्हणाले की मला एकदम तसे सर्व काही उघड करून सांगता येणार नाही. मात्र सर्व अधिकारी वाईट काम करतात असे नाही तर काही अधिकारी चांगले काम करीत आहेत. पोलीस खात्यात काही अधिकारी असेही असतात की त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात. पण याच्याबाबतीत मी जाहीर वक्तव्य करू इच्छित नाही. हे सांगताना गृहमंत्र्यांच्या चेहरा गंभीर आणि अस्वस्थ जाणवत होता आणि त्यांची नाराजी लपून राहिली नाही.
या वृत्तवाहिनीकडून याबाबत खुलासा करताना चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. त्यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता.
त्यांनी आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, असे सांगणे, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत, अशी विधाने करणे, असे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वत: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यात हस्तक्षेप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात चर्चा झाली आणि हे प्रकरण योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात आले. असा खुलासा या वृत्तवाहिनीने केला आहे.