केडगाव : दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी महेश म्हेत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. भाऊसाहेब शेलार यांनी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंचपदाची जागा रिक्त झाली होती. यानंतर केडगाव ग्रामपंचायतच्या सरपंच सौ.पूनम गौरव बारवकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली.
महेश मल्हारी म्हेत्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ठरवून दिलेल्या वेळेमध्ये अन्य कोणत्याही इच्छुकाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला नाही त्यामुळे दुपारनंतर महेश म्हेत्रे यांची केडगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा निवड प्रक्रियेच्या अध्यक्षा सौ. पूनम गौरव बारवकर यांनी केली.
महेश म्हेत्रे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर कुल गटाने फटाके फोडून जल्लोष केला तर आपण आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना या केडगावमध्ये राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी म्हेत्रे यांनी जाहीर केले.







