Big News : ‛हाथरस’मध्ये सामूहिक बलात्कार करून हत्या केल्या प्रकरणी दौंडमध्ये निषेध मोर्चा



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार व  हत्या प्रकरण आणि शेतकरी विरोधी विधेयक प्रकरणाचा येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टी व  काँग्रेस पक्षाच्या वतीने दौंडमध्ये निषेध नोंदविण्यात आला. शहरातील शिवाजी चौक ते तहसील कार्यालय असा निषेध मोर्चा काढीत दोन्ही पक्षाच्या वतीने केंद्र व उत्तरप्रदेश सरकारचा धिक्कार करण्यात आला, यावेळी तहसीलदारांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.

हाथरस येथील मुलीवर अमानुषपणे सामूहिक बलात्कार करून तिची क्रूररित्या हत्या करण्यात आली आहे, उत्तर प्रदेशातील भाजपा सरकार येथील एका समाजावर अन्याय अत्याचार करीत आहे त्यामुळे आम्ही या अन्यायाचा निषेध करीत आहोत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

तसेच केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने शेतकरी विरोधी तीन विधेयके संसदेत मंजूर करून घेतली असून या नवीन कायद्यामुळे शेती आणि शेतकरी पूर्णपणे उध्वस्त होणार आहे. या दोन्ही घटनांच्या विरोधात सामान्य जनता व  शेतकरी रस्त्यावर उतरून निषेध करीत असताना निर्दयी भाजपा सरकार त्यांचा आवाज दाबण्यासाठी अमानुषपणे लाठीमार करीत आहे. 

संसदेमध्येही कोणाशीही  चर्चा न करता गरीब शेतकऱ्यांवर हा  कायदा लादला जात आहे, सदरचा कायदा रद्द करून शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा अशी मागणी ही निवेदनातून करण्यात आली आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टी व  काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व  कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.