Mobile Tower : गोपाळवाडी मधील मोबाईल टॉवर वादाच्या भोवऱ्यात! टॉवर विरोधात महिलांची दौंड पोलीस स्टेशनला तक्रार, आंदोलनाचा इशारा



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

दत्तनगर( गोपाळवाडी, ग्रामपंचायत) परिसरातील खाजगी जागेमध्ये एका मोबाईल कंपनीचे टॉवर उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र भर लोकवस्तीत या ठिकाणी टॉवर उभारणी करू नये म्हणून स्थानिक महिला आणि नागरिक एकवटले असून त्यांनी सदर कामा विरोधात दौंड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यामुळे या मोबाईल टॉवरचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, स्थानिकांच्या विरोधा नंतरही काम  सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणने असून त्यामुळे दत्तनगर परिसरात तणावाचे वातावरण आहे.

दत्त नगर मधील लोकवस्तीमध्ये असलेली जागा हि तेथील जागा मालकाने मोबाईल कंपनीला टॉवर उभारणीसाठी भाडेतत्त्वावर दिली आहे. सदर मोबाईल टॉवर भर वस्तीमध्ये  येत असल्याचे तेथील नागरिकांचे म्हणणे असून परिसरात राहणाऱ्या कुटुंबांना भविष्यात त्याचा त्रास होणार असल्याचे ते सांगत आहेत.

या ठिकाणी टॉवर पडण्या सारखा अपघात झाल्यास स्थानिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची  शक्यता आहे. दत्त नगर मधील रहिवाशांच्या जीविताचा विचार करून सदर मोबाईल टॉवर चे काम तात्काळ बंद करण्या बाबत पोलिसांनी कार्यवाही करावी असे तक्रार अर्जात नमूद केले आहे.

दि.10/8/2020 रोजी गोपाळवाडी ग्राम पंचायतीच्या ग्राम सभेमध्ये सदर टॉवर बांधकाम करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली  होती. हा टॉवर भविष्यात अपघातास कारणीभूत करू शकतो अशा प्रकारची चर्चा सुद्धा सभेमध्ये झाली.

त्यामुळे सर्वानुमते रहिवासी झोन मध्ये मोबाईल टॉवर उभारणीला ना हरकत दाखला देऊ नये असा निर्णय घेण्यात आला आहे, असे असतानाही सदर टॉवरचे काम सुरू करण्यात आल्याने स्थानिक  रहिवाशांनी दौंड पोलीस स्टेशनला धाव घेत सदरचे काम थांबविण्यात यावे अशी मागणी केली आहे. सदरचे काम थांबविण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिक आणि महिलांनी दिला आहे.