दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)
रेल्वेच्या इ तिकिटांची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या एकास रेल्वेच्या सोलापूर विभागाच्या CIB पथकाने कुरकुंभ येथून ताब्यात घेतल्याची घटना समोर आली आहे.
संजय ज्ञानदेव मचाले(वय 27,रा. जिरेगाव, ता. दौंड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. घटनेबाबत दौंड RPF ने दिलेली माहिती अशी की, सोलापूर विभागातील CIB पथकाला कुरकुंभ या ठिकाणी रेल्वे प्रवासाच्या E तिकिटांची बेकायदेशीरपणे विक्री होत असल्याची खबर मिळाली, त्या नुसार पथकाने कुरकुंभ येथील संजय इंटरप्राईजेस या दुकानावर छापा टाकला असता संजय मचाले हा बेकायदेशीरपणे E तिकिटांच्या विक्रीचा व्यवसाय करीत असताना आढळून आला आहे.
पथकाने त्याला ताब्यात घेत त्याच्याकडील एक मोबाईल फोन,लॅपटॉप तसेच 1 लाख 1 हजार 349 रुपयांचे 129 E तिकीट असा मुद्देमाल जप्त केला आहे. मचाले हा कुरकुंभ MIDC मध्ये काम करणाऱ्या परप्रांतीय प्रवाशांकडून जास्तीची रक्कम घेऊन त्यांना बेकायदेशीर पणे रेल्वेची तिकिटे विक्री करीत असावा असा अंदाज वर्तविला जात आहे.
संजय मचाले याच्या विरोधात रेल्वे कायदा 143 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाई साठी त्याला दौंड RPF यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास दौंड RPF चे पोलीस उपनिरीक्षक सुनील यादव करीत आहेत.