Daund : आमदार राहुल कुल यांच्याकडून खोर, देऊळगाव, बोरीपार्धीसह अन्य नुकसानग्रस्त भागाची पाहणी



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

संपूर्ण राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातल्यानंतर आता हळू हळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

दौंड तालुक्यातही या पावसाचा मोठा फटका बसला असून संपूर्ण तालुक्यामध्ये शेतकरी आणि नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी कालपासून केली आहे.

आमदार कुल यांनी काल खानवटे, राजेगाव, स्वामी चिंचोली, मळद, रावणगाव, नंदादेवी या परीसराची पाहणी दौंडचे तहसीलदार संजय पाटील तहसीलदार, अजिंक्य येळे (गटविकास अधिकारी), सुनील महाडिक (पोलीस निरीक्षक दौंड), हरीश्चंद्र माळशिकारे (उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग) तसेच महसूल विभागाचे अधिकारी यांचेसह केली.

 तर आज त्यांच्याकडून खोर, भांडगाव, देऊळगाव गाडा, पडवी, बोरीपार्धी, केडगाव, खोपोडीसह अन्य गावांची पाहणी सुरू आहे. संपूर्ण पुणे जिल्हा आणि परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टिमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तेव्हा नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई मिळावी, पूरस्थितीमुळे ठीक ठिकाणी रस्ते, छोटे पुल व बंधारे वाहून जावून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करावा.

अतिवृष्टीमुळे दुर्दैवाने खानवटे, ता. दौंड गावचे चार नागरिक राजेगाव मधून वाहून गेले त्यातील तीन मृतदेह आढळले आहेत तर एकाचा शोध अद्याप सुरू आहे याकामी आपात्कालीन सुरक्षा दलाची विशेष टीम उपलब्ध करावी तसेच त्यांच्या कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी मागणी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे केली असून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे कडे देखील याकामी पाठपुराव्याचे आश्वासन त्यांनी पीडितांच्या कुटुंबीयांना दिले आहे.

या पाहणी दौऱ्यात आमदार कुल यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष  माऊली आण्णा ताकवणे, बोरीपार्धीचे जयदीप सोडनवर, सोमनाथ गडधे, आबा चोरमले व परीसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते.