राज्य सरकारने शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अब्बास शेख)

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, दौंडचे आमदार राहुल कुल यांनी आज दौंड तालुक्यातील कुरकुंभ, मळद, रावणगाव, खडकी, स्वामी चिंचोली येथे भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी परिसरातील शेतकरी बंधूंशी संवाद साधला व विविध मागण्यांची निवेदने स्वीकारली. 

अतिवृष्टीचा दौंड तालुक्याला मोठा फटका बसला असून विविध भागातील १३ मुख्य रस्ते, गावांना जोडणारे पुल, वाड्या वस्त्यांना जोडणारे छोटे रस्ते व पूल वाहून गेले आहेत. स्वामी चिंचोली, मळद, राजेगाव व खानवटे या भागातील घरांमध्ये  मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरून घरातील जीवनावश्यक वस्तुंचे, घर व वखारी मधील साठवलेले धान्याचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

ओढ्याचे तसेच पुराचे पाणी शेतामध्ये शिरल्यामुळे ऊसाच्या पिकाचे, भुसार पिकांचे व फळ बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या गाई, म्हशी, बैल आदी वाहून जाऊन पशुधनाची देखील मोठी हानी झाली आहे. हि बाब दौंडचे आमदार राहुल कुल यांनी देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांच्या निदर्शनास आणून दिली.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाने शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी यासाठी आपण पाठपुरावा करू, आणि अशा परीस्थितीमध्ये राजकारण न करता शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी असे आवाहन त्यांनी केले.