पुणे : सहकारनामा ऑनलाइन
पुणे जिल्ह्यात गाजलेल्या अप्पा लोंढे खून प्रकरणातील संशयितांवर आज मंगळवार दि. 03 नोव्हेंबर रोजी आरोपी निश्चिती करण्यात आली आहे. लॉकडाउन शिथिल केल्यानंतर आरोप निश्चिती करण्यात आल्याचे हे जिल्ह्यातील पहिलेच प्रकरण असल्याचे समोर येत आहे.
अप्पा लोंढे खून प्रकरणात विष्णू यशवंत जाधव, नागेश लक्ष्मण झाडकर, मनी कुमार चंद्रा ऊर्फ अण्णा, विकास प्रभाकर यादव, गोरख बबन कानकाटे, संतोष भीमराव शिंदे, नीलेश खंडू सोलनकर, राजेंद्र विजय गायकवाड, आकाश सुनील महाडीक, नितीन महादेव मोगल, अण्णा ऊर्फ बबड्या किसन गवारी, प्रमोद ऊर्फ बापू काळुराम कांचन, सोमनाथ काळुराम कांचन, रवींद्र शंकर गायकवाड, प्रवीण मारुती कुंजीर यांच्याविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आले होते.
खून झालेला अप्पा लोंढे याची भविष्यात कोणत्याही बाबतीत अडचण येऊ नये म्हणून संबंधित आरोपींनी त्याचा खून केल्याचे तपासात समोर आले.
हे प्रकरण विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश ए. एन. शिरशीकर यांच्या खंडपीठापुढे सुरू आहे.
या सर्व आरोपींवर खून, बेकायदा जमाव जमवून दंगल करणे, भारतीय हत्यार कायदा, मोक्का नियंत्रण कायदा अशा विविध कलमांनुसार आरोप निश्चिती करण्यात आली आहे.
सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता न्यायालयात केवळ महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी घेतली जात आहे. आणि त्यातील हे पहिलेच असे प्रकरण आहे ज्यामध्ये न्यायाधीशांनी व्हीसीद्वारे आरोप निश्चिती केली आहे अशी माहिती आरोपींचे वकील ऍड. विजयसिंह ठोंबरे यांनी दिली.
या प्रकरणात अप्पा लोंढे हा सकाळी मॉर्निंगवाकला जात असताना त्याचा खून करण्यात आला होता. त्याबाबतची फिर्याद त्याचा मुलगा वैभव प्रकाश ऊर्फ अप्पा लोंढे याने दिली होती.