पुणे सोलापूर हायवेवर LCB कडून 150 किलो गांजासह 28 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त



पुणे : सहकारनामा ऑनलाइन 

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (LCB) कडून  अवैध गांजा वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात येऊन त्याच्याकडून सुमारे २४ लाख १० हजार ५०० रु. किमतीचा १५० किलो गांजा तसेच ४ लाख किमतीची एक चारचाकी कार असा एकूण २८ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांच्याकडून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश  देण्यात आले होते.

या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमण्यात आले.  या पथकाने गेल्या काही दिवसांपूर्वी गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमी वरून उरुळी कांचन येथे २ सराईताकडून २८ किलो वजनाचा गांजा तसेच एक चारचाकी वाहन  असा एकूण ८लाख २०हजार रु किमतीचा मुद्देमाल जप्त केला होता.

पुणे ग्रामिण जिल्ह्यात अशी अवैध्य गांजाची वाहतूक थांबवण्यासाठी सदरील पथकाने दि. ६/११/२०२० रोजी मिळलेल्या बातमीवरून भिगवण पोलिस स्टेशन हद्दीत टाटा कंपनीची झेस्ट मॉडेलची सिल्वर रंगाची चारचाकी वाहन क्रमांक एम एच १३ सी एस १६२६ मध्ये पुणे सोलापूर हायवेवरून अवैधरित्या गांजा वाहतूक केली जाणार असल्याची माहिती बातमीदारा मार्फत मिळाली होती. त्यानुसार भादलवाडी हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर अकोला फाट्या जवळ सदर पथकाने सापळा रचून  वरील वर्णनाची गाडी ताब्यात घेतली त्यावेळी त्यामध्ये इसम सचिन कुमार मिरगणे (वय 32 वर्षे रा सुभाष नगर चौदा नं शाळे पाठीमागे बार्शी ता बार्शी जि सोलापूर) हा गाडीत बसलेला आढळला.

गाडीची अधिक पाहणी केली असता मागील सीटवर ३ खाकी रंगाच्या मोठ्या गोण्या मिळून आल्या तसेच सदरील गाडीच्या डिकीमध्ये खाकी रंगाच्या २ मोठ्या गोण्या मिळून आल्या सदरील गोण्या उघडून पाहिले असता त्यामध्ये पहिल्या गोणीत ५ लाख २० हजारचा गांजा हा अमली पदार्थ  रु १५ हजार किलो या प्रमाणे खाकी गोणीत १६ पाकिटे  वजन ३४ किलो ७०० ग्रॅम सापडले, दुसऱ्या गोणीत ५ लाख १० हजार ची १६ पाकिटे  त्याचे गोणीसह वजन ३४ किलो, तिसऱ्या गोणीत ५ लाख २५ हजार रु ची १६ पाकिटे  त्याचे गोणीसह वजन ३५ किलो, चौथ्या गोणीत ५ लाख २२ हजार रु.चे १६ पाकिटे त्याचे गोणीसह वजन ३४ किलो ८०० ग्रॅम तसेच पाचव्या गोणीत ३ लाख ३३ हजार रु.चे ११ पाकिटे त्याचे गोणीसह वजन २२ किलो २०० ग्रॅम आणि  ४ लाख रु. किंमतीची सिल्वर रंगाची टाटा कंपनीची झेस्ट कार क्र एम एच १३ सी एस १६२६ असा एकूण २८ लाख १० हजार ५०० रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरील आरोपीवर गुंगीकारक औषध द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९५८ चे कलम ८(क),२०(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी ची वैद्यकीय तपासणी करून मुद्देमाल सह पुढील तपास कामी भिगवण पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

सदर आरोपीवर सुर्यपीठ  राज्य तेलंगणा येथे  २०१३ साली गुंगीकारक औषध द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९५८चे कलम ८(क),२०(क) नुसार गुन्हा दाखल आहे. सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, बारामती उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट,  पो.उप निरीक्षक शिवाजी ननवरे, पो हवा रविराज कोकरे, पो हवा अनिल काळे, पो ना अभिजित एकशिंगे, पो ना विजय कांचन, पो कॉ धिरज जाधव तसेच भिगवण पो स्टे चे पो ना आर आर पठाण, पो कॉ ए एम माने यांनी केली.