दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)
दौंड शहरातील रिलायन्स पेट्रोलपंपावर पाणी पिण्यासाठी गेलेल्या एका नागरीकाची एक लाख रुपयांची असलेली पिशवीच अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेचे चित्रीकरण पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
याबाबत राजेंद्र हरिभाऊ थोरात (वय ५२ रा.कवठा ता श्रीगोंदा जि अहमदनगर) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (दि.११) दुपारी राजेंद्र थोरात यांनी महाराष्ट्र बॅकेतून तीन लाख रूपये काढले होते. यापैकी दोन लाख रूपये त्यांनी काका पाटोळे रा. नानवीज (ता.दौंड) यांना दिले.
उर्वरित एक लाख रूपये एका पिशवीत ठेवले होते. ती पिशवी त्यांनी त्याच्याकडील दुचाकीच्या हॅडलला लटकवलेली होती. त्यानंतर दुपारी 2 वा. दरम्यान दुचाकी घेऊन ते रिलायन्स पेट्रोलपंप येथे थांबले व तिथे दुचाकी लावून पाणी पिण्यासाठी म्हणून बाजूला गेले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने दुचाकीची पिशवी चोरून नेली. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती ठाणे अंमलदार श्रावण गुपचे यांनी दिली. फिर्यादी थोरात यांनी जेव्हा बँकेतून पैसे काढले तेथूनच हे चोरटे पैशाच्या चोरीच्या उद्देशाने त्यांचा पाठलाग करीत असावे, व संधी मिळताच त्यांनी पैशाची पिशवी लंपास केली अशी चर्चा स्थानिक करीत आहेत.
दौंड पोलिसांनी पंपावरील CCTV फुटेज मधील चोरट्याचे छायाचित्र शहरातील अनेक व्हाट्सअप ग्रुपवर टाकून अशा वर्णनाची व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास पोलीस हवालदार तन्वीर सय्यद करीत आहे.