आमदार ॲड. राहुल कुल यांच्या पाठपुराव्याला यश, दौंड बसस्थानक व आगारासाठी 7 कोटींचा निधी मंजूर

अब्बास शेख

दौंड : पुणे विभागातील दौंड बसस्थानक आणि आगाराच्या नूतनीकरणासाठी आमदार ॲड. राहुल कुल यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या परिवहन व गृह विभागाने या प्रकल्पासाठी ७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता प्रदान केली आहे. या निर्णयामुळे दौंडमधील प्रवाशांच्या आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप प्राप्त होणार आहे.

दौंड बसस्थानकाची दुरवस्था आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन आमदार ॲड. राहुल कुल यांनी शासनाकडे यासंदर्भात वारंवार मागणी केली होती. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०२५ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या निधीतून बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलला जाणार असून, प्रवाशांना आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

प्रशासकीय मंजुरी मिळालेल्या ७ कोटी रुपयांच्या निधीतून पुढील प्रमुख कामे केली जातील: मुख्य आगार इमारतीचे पूर्णपणे नूतनीकरण करण्यात येईल. चालक-वाहकांसाठी टॉयलेट ब्लॉकसह सुसज्ज विश्रांतीगृह, महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रांतीगृह आणि लाईन चेकिंग पथकासाठी स्वतंत्र खोली बांधण्यात येईल. आगार आणि बसस्थानक परिसराचे एकूण २ कोटी ७७ लाख ३० हजार रुपये खर्चून काँक्रीटीकरण करण्यात येईल, ज्यामुळे चिखल आणि धुळीचा प्रश्न कायमचा मिटेल. कॅश इशू सेक्शन, लेखा शाखा आणि आगार व्यवस्थापकांसाठी नवीन निवासस्थानाचे बांधकाम केले जाईल. रेन वॉटर हार्वेस्टिंग, आधुनिक फायर फायटिंग यंत्रणा, कुंपण भिंत आणि नवीन गेटची उभारणी केली जाईल.

सदर काम सुरू करण्यापूर्वी वास्तुविशारदांकडून नकाशा मंजूर करून घेणे आणि तांत्रिक मान्यता मिळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. कामाचा दर्जा राखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आमदार ॲड. राहुल कुल यांनी मिळवून दिलेल्या या मोठ्या निधीमुळे दौंड परिसरातील प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत असून, बसस्थानकाचे काम लवकरात लवकर सुरू होण्याची प्रतीक्षा आता नागरिकांना लागली आहे.