भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना दौंड पोलिसांचा पुन्हा मोठा दणका, 17 यांत्रिक बोटी उध्वस्त तर 11 जणांवर गुन्हा दाखल



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

दौंड हद्दीतील भीमा नदी पात्रांमध्ये राजरोसपणे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना दौंड पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा दणका दिला आहे. वाळू उपसा करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या 9 फायबर व 8 सेक्शन बोटी जिलेटिन च्या साह्याने उध्वस्त करण्यात आल्या असून 11 वाळू माफियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पोलिसांनी केलेल्या कारवाई  मध्ये 2 कोटी 36 लाख 25 हजार रुपयांचे नुकसान झाल्याने वाळू माफियांचे कंबरडे मोडले असून त्यांचे धाबे ही  दणाणले आहेत.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन असल्याने नाईलाजास्तव वाळू माफियांनी सुद्धा आपला अवैध वाळू उपशाचा गोरख धंदा बंद ठेवलेला होता. परंतु सगळीकडेच लॉकडाऊन शिथिल झाल्याचे लक्षात येताच वाळू माफियांनी आपले डोके पुन्हा वर काढले व भीमा नदी पात्रात राजरोसपणे अवैध वाळु उपसा करण्याचा धंदा पुन्हा जोमात सुरू केला. याची पक्की खबर दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांना मिळताच त्यांनी तत्काळ आपल्या सहकाऱ्यांसमवेत भीमा नदी पात्रात उतरून बेलगाम झालेल्या वाळू माफियांच्या अड्ड्यांवर धाड टाकीत वाळू उपसा करणाऱ्या बोटी पकडून त्या जिलेटिन च्या साह्याने उडवून दिल्या. तसेच भीमा नदी पात्रातील एक जेसीबी मशीन व 30 ब्रास वाळू साठा जप्त केला आहे. 

अवैध वाळू उपसा करणाऱ्या नाना गवळी (कानगाव,दौंड) बंडू सातव, हरिभाऊ होलम, बाळू मोरे (रा. शिरापूर,दौंड) विठ्ठल माळवदकर (रा. बाभुळगाव, ता.कर्जत, नगर) दत्ता गायकवाड (रा. जिंती मळा,ता. करमाळा) संदीप काळे (रा. आलेगाव, दौंड), सलमान मुलाणी (रा. भिगवन) संदीप उर्फ सँडी कशमिरे (रा. घंटा चाळ, दौंड) गिरीश मुलचंदानी (रा. दौंड) गोविंद भिसे (रा शिरापूर) तसेच इतर कामगारांन विरोधात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. 

पुणे जिल्हा ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आली. 

उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस  कर्मचारी नंदकुमार केकान, दीपक वाईकर, सुभाष डोईफोडे, धनंजय गाढवे, कमलेश होले, होमगार्ड प्रशांत चितारे, चालक विजय पवार तसेच बारामती RCP पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी कारवाईमध्ये भाग घेतला.