Crime News
पारगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील पारगाव येथे एका शिक्षकाने शाळेतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या शिक्षकावर बी.एन.एस. कलम 74, बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम कलम 8 व 12,
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम कलम 3(1)(w)(i) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही भयंकर घटना दिनांक 18/12/2025 रोजी दुपारी 1:00 च्या सुमारास, पारगाव (ता. दौंड, जि.पुणे) येथील एका शाळेत घडली आहे. याबाबत 13 वर्षे 08 महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीनुसार यवत पोलिसांनी आरोपी प्रशांतकुमार हरिचंद्र गावडे, (रा. पारगाव, ता. दौंड, जि. पुणे) याच्यावर वरीलप्रमाणे विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी व इतर ५ ते ६ विद्यार्थिनी शाळेतील प्रदर्शनाकरिता तयारी करीत असताना, शाळेतील शिक्षक आरोपी प्रशांतकुमार गावडे हा वर्गामध्ये आला. त्यावेळी त्याने फिर्यादीचा उजवा हात हातात धरून “आपण दोघे मिळून स्पर्धेचे नंबर ठरवू” असे म्हणून फिर्यादीच्या शेजारील बाकावर बसला. त्यानंतर त्याने फिर्यादीचा विनयभंग केला. या सर्व प्रकाराने अल्पवयीन मुलगी घाबरून गेली आणि त्यानंतर तिने धाडस करुन या प्रकाराला वाचा फोडत यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेचा पुढील तपास
बापूराव दडस (उपविभागीय पोलीस अधिकारी, दौंड उपविभाग, दौंड) हे करीत आहेत.






