रेल्वे प्रवाशाची किमती ऐवजाची बॅग चोरून फरार झालेल्या आरोपीस दौंड लोहमार्ग पोलिसांनी पाठलाग करून केले जेरबंद

दौंड : बेंगलोर -मुंबई उद्यान एक्सप्रेस गाडी ने प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या 10 लाख 19 हजार रुपयांच्या किमती ऐवजांवर डल्ला मारणाऱ्या चोरट्यास दौंड लोहमार्ग पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले. चोरट्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करण्यात पोलिस पथकाला यश आले असल्याची माहिती लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी दिली.

याप्रकरणी भाविक ललित कुमार जैन(रा. मुंबई) यांनी फिर्याद दिली. चन्नावीर बस्वराज रामशेट्टी(वय 27,रा. कुंभार गल्ली लक्ष्मी जवळ आळंदसूर,ता. उमरगा, जिल्हा कलबुर्गी) असे अटक आरोपीचे नाव आहे.
दौंड लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या पत्नीसह दि. 15 डिसेंबर रोजी दुपारी 2 च्या दरम्यान मुंबई- बेंगलोर एक्सप्रेस गाडीने बेंगलोर ते मुंबई असा प्रवास करीत होते. दरम्यान दोघांच्या झोपेचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांची लॅपटॉपची बॅग चोरली. बॅगेमध्ये लॅपटॉप, दोन आयफोन ,पत्नीचे सात तोळे वजनाचे दागिने तसेच 33 हजार रुपये रोख रक्कम होती.

गाडी दौंड रेल्वे स्थानकामध्ये आल्यानंतर आपल्या बॅगेची चोरी झाल्याचे फिर्यादी यांना समजले. त्यामुळे त्यांनी दौंड लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार नोंदविली. दौंड लोहमार्ग पोलीस ,स्थानिक गुन्हे शाखा तसेच आर.पी.एफ. खुफिया शाखेने तत्काळ तपास सुरू केला. पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेत पुणे -सोलापूर महामार्गावर चोरट्याचा माग काढण्यास सुरुवात केली. यावेळी मळद, चिंचोली, भिगवन, लोणी, इंदापूर, टेंभुर्णी, वेनगाव, मोहोळ अशा गावांमधून चोरटा प्रवास करत असलेली माहिती मिळत गेली. प्रत्येक वेळी एसटी स्टँड चे लोकेशन मिळत असल्याने चोरटा एसटी ने प्रवास करतो आहे याची पोलीस पथकाला खात्री झाली.

त्यामुळे पथकाने एका संशयित एसटीचा पाठलाग करीत ती एसटी (मंचर- अक्कलकोट) मोहोळ गावाजवळ थांबविली. एसटी चालक व वाहकास घटनेची माहिती देऊन पथकाने एसटीची तपासणी सुरू केली असता, एक संशयित व्यक्ती दरवाज्याच्या मागील सीटवर बसलेली दिसली. त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात दोन आयफोन, सोन्याचे दागिने व रोख रक्कम 33 हजार रुपये सापडले. पोलीस पथकाने नाव विचारले असता त्याचे नाव चनावीर रामशेट्टी असल्याचे त्याने सांगितले. हस्तगत मुद्देमालासह त्यास अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यातील न सापडलेल्या लॅपटॉप बाबत त्याच्याकडे तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज कुमार यादव, पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब अंतरकर, यांच्या मार्गदर्शनाने पोलीस हवालदार कोंगे, पोलीस अंमलदार आकाश चव्हाण, सजित जगताप, संदीप उसरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार आनंद वाघमारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनंजय वीर, पोलीस कर्मचारी नरेंद्र पवार व चालक संदीप काकडे या पथकाने केली.