विशेष प्रतिनिधी
नागपूर : हिवाळी अधिवेशनात आमदार ॲड. राहुल कुल यांनी पुणे जिल्हा आणि परिसरातील महत्त्वाच्या रस्ते, उन्नत मार्ग व मेट्रो प्रकल्पांच्या अंमलबजावणी संदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी मंत्री दादाजी भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी रिंग रोड, उन्नत महामार्ग आणि मेट्रो प्रकल्पांना गती देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
अंतर्गत व बाह्य रिंगरोड आणि उन्नत मार्गांची कामे वेळेत व वेगाने करण्याची विनंती आमदार अॅड. राहुल कुल यांनी केली त्यावर बोलताना मंत्री महोदय म्हणाले कि, पूर्व रिंग रोडच्या १२ पैकी ९ पॅकेजचे काम सुरु झाले असून, उर्वरित ३ पॅकेजची निविदा अंतिम टप्प्यात आहे. पश्चिम रिंग रोडच्या ५ पॅकेजची कामे वेगाने सुरू आहेत. यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल.
पुणे – सोलापूर मार्गावरील हडपसर ते यवत आणि पुणे – नगर मार्गावरील पुणे ते शिरूर या उन्नत मार्गांसाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच कामांना सुरुवात होईल असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच पुणे – सोलापूर, पुणे – अहिल्यानगर आणि पुणे -राजगुरुनगर या मार्गांवर वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक अतिरिक्त ‘साईड लेन’ विकसित करण्याच्या मागणीला मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
एमएसआरडीसीचे रिंग रोड, पीएमआरडीए इनर रिंग रोड आणि मेट्रो प्रकल्पांचे एकात्मिक नियोजन करण्याची विनंती आमदार ॲड. राहुल कुल यांनी केली, जेणेकरून वाहतूक व्यवस्था अधिक प्रभावी बनेल. पुणे ते छत्रपती संभाजीनगर या ग्रीन फिल्ड प्रकल्पाचे भूसंपादन सध्या चालू आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गाच्या कामासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. खडकवासला बंदनळी कालव्यामुळे पुणे शहरात मोकळ्या झालेल्या जमिनीचा वापर वाहतूक नियोजनासाठी करण्याबाबत सकारात्मकता दर्शविण्यात आली.
आमदार ॲड. राहुल कुल यांनी पुणे जिल्ह्यातील नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या समस्यांवर लक्ष वेधल्यामुळे, आगामी काळात पुणे जिल्हा व परिसरातील वाहतूक समस्या सुटणार आहे.
मेट्रोचा विस्तार यवतपर्यंत – पुणे मेट्रोचा लोणी काळभोरपर्यंत झालेला विस्तार यवतपर्यंत नेण्याची मागणी आमदार कुल यांनी केली. मंत्री भुसे यांनी या विस्तारासाठी आवश्यक तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी बैठक घेण्याची व पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे पुणे पूर्व भागातील कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.






