आमदार राहुल कुल यांनी समोर आणला ‘टोल’ चा ‘झोल’, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून कार्यवाहीचे आश्वासन

विशेष प्रतिनिधी

नागपूर : आमदार राहुल कुल यांनी नागपूर च्या हिवाळी अधिवेशनात टोल चा सुरु असलेला झोल समोर आणून सर्वसामान्य वाहनचालकांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. ई-वाहनांचा चुकीचा टोल परत करा, ‘आरेरावी’ करणाऱ्या टोलचालकांवर दंडात्मक कारवाई करा अशी मागणी आ. राहुल कुल यांनी हिवाळी अधिवेशनात केली असून सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले आहे. आमदार कुल यांच्या मागणीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान आमदार राहुल कुल यांनी राज्यातील महत्त्वाच्या महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहने चालकांकडून केली जाणारी टोल वसुली, टोलचालकांची मनमानी आणि रस्त्यांच्या दर्जाबाबत अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. त्यांच्या सर्व जनहितकारी मागण्यांवर सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) श्री. दादाजी भुसे यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

आमदार राहुल कुल यांनी प्रामुख्याने मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग आणि शिवडी – न्हावाशेवा अटल सेतू या प्रमुख महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहन (EV) धारकांकडून वसूल करण्यात आलेल्या चुकीच्या टोलचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी मागणी केली की, केवळ या तीन महामार्गांपुरती मर्यादित न राहता, सर्वच महामार्गांवर ईव्ही धारकांकडून चुकीच्या पद्धतीने वसूल केलेला टोल तातडीने परत करण्यात यावा. भविष्यात टोल वसुलीच्या चुकीच्या पद्धती रोखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी संबंधित टोल चालकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

टोल बूथवरील MSRDC आणि इतर टोल चालकांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करताना आमदार कुल यांनी अनेक महत्त्वपूर्ण तक्रारी मांडल्या. टोल बूथवर टोलचालकांकडून नागरिकांशी आरेरावी केली जाते. तसेच, रस्त्याचा दर्जा राखला जात नाही आणि प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा अभाव असतो. टोल वसुलीच्या वेळी संबंधित अटीशर्तींचे पालन केले जात नाही. अशा अटीशर्ती न पाळणाऱ्या टोलचालकांवर तक्रार आल्यास तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, असे त्यांनी सभागृहात सांगितले.

टोल बूथ हे पोलिसांच्या वाहने तपासणी आणि दंडवसुली करण्याचे एक केंद्र बनले आहे, याकडेही आमदार कुल यांनी लक्ष वेधले. बूथवर वाहन पोलिसांनी तपासणी जरूर करावी, परंतु या दरम्यान ट्रॅफिक नियमांचे काटेकोर पालन करणे आणि वाहतूक सुरळीत ठेवणे अपेक्षित आहे, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल.

आमदार राहुल कुल यांनी उपस्थित केलेल्या या सर्व महत्त्वपूर्ण मागण्यांवर सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) श्री. दादाजी भुसे यांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असून, यामुळे टोल वसुली प्रक्रियेत पारदर्शकता येऊन सामान्य नागरिक आणि ईव्ही धारकांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.