दौंड तालुक्यात ‘हिट अँड रन’ ची घटना, भरधाव कार च्या धडकेत ‘ माय लेकराचा ’ मृत्यू

खडकी-रावणगाव : दौंड तालुक्यातील खडकी येथे सर्व्हिस रोडवर पायी चाललेल्या ३८ वर्षीय महिला आणि तिच्या ११ वर्षीय मुलाला एका भरधाव कार ने जोरदार धडक दिल्याने त्या दोघांचा मृत्यू झाला आहे. या दोघांना धडक दिल्यानंतरही हा कार चालक कारसह पळून गेला आहे.

या घटनेची फिर्याद सौ.ज्योती दादाजी सावंत. (वय-30 वर्षे, व्यवसाय-गृहिणी, रा. तुकाईनगर, खडकी ता. दौंड, जि. पुणे) यांनी दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी हा त्याच्याकडे असणारी पांढऱ्या रंगाची चार चाकी कार नं MH 12 XQ 0201 ही चालवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 08/12/2025 रोजी दुपारी 12.30 च्या सुमारास खडकी गावच्या हद्दीतील शिंदे ॲक्वा पाणी प्लँन्टजवळ पुणे – सोलापुर हायवेच्या सर्विस रोडवर त्या आणि त्यांची चुलत सासू रूपाबाई सिताराम सावंत व तिचा मुलगा संग्राम सिताराम सावंत हे पायी चालत जात असताना समोरून पुणे बाजूकडुन येणारे पांढऱ्या रंगाच्या चार चाकी कार नं MH 12 XQ 0201 वरिल अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगात व रहदारीच्या नियमाकडे दुर्लक्ष करून या दोघांना जोरदार धडक दिली.

या धडकेत चुलत सासू रूपाबाई सिताराम सांवत (वय-38 वर्षे) व तिचा मुलगा संग्राम सिताराम सावंत (वय-11 वर्षे, दोघे रा.खडकी ता.दौंड जि पुणे) हे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. सदर कार चालक हा या दोघांच्या मृत्युस कारणीभूत झाला. त्याने पोलिसांना अपघाताची खबर न देता आणि जखमिंना औषधोपचारकामी न नेता तेथून पळून गेला असे फिर्यादित म्हटले आहे. सौ. ज्योती सावंत यांच्या फिर्यादीवरून वरील कार च्या अज्ञात चालकावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार मलगुंड हे करीत आहेत.