न्यू अंबिका कला केंद्राच्या वैशाली वाफळेकर यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्याकडून कलाकारांचे अभिनंदन

दौंड : सहकारनामा
कलेच्या विविध क्षेत्रात प्रतिवर्षी नाटक, कंठसंगीत, उपशास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी चित्रपट, कीर्तन/समाजप्रबोधन, तमाशा, शाहिरी, नृत्य, लोककला, आदिवासी गिरीजन, कलादान, प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील अभ्यासक, लोकनृत्य, लावणी/संगीतबारी, या क्षेत्रांमध्ये ज्या कलाकारांनी प्रदीर्घ काळ सेवा केलेली आहे अशा कलावंताना राज्य सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी लावणी संगीतबारीसाठी वाखारी चौफुला येथील न्यू अंबिका कलाकेंद्राच्या लावणी कलावंत श्रीमती वैशाली वाफळेकर यांना राज्य शासनाचा राज्य सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाला आहे. वैशाली वाफळेकर यांसह पुरस्कार मिळालेल्या विविध क्षेत्रातील कलावंतांचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे.

या पुरस्कारात शासनाकडून ज्येष्ठ व्यक्तींना तीन लाख रुपये तर युवांना पुरस्कारासाठी एक लाख रुपये, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. हे सर्व पुरस्कार मुंबई येथे सर्व कलाकारांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत असतात. न्यू अंबिका कलाकेंद्राचे संचालक आणि महाराष्ट्र थिएटर चालक, मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ.अशोकबाबा जाधव यांनी श्रीमती वैशाली वाफळेकर यांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे अभिनंदन केले आहे आणि अश्या कलावंतांमुळे कलेला खरा न्याय मिळतो असे मत व्यक्त केले आहे. राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेल्या अनेक कलावंतांपैकी काही कलावंतांची नावे खालीलप्रमाणे..

युवा पुरस्कार : लावणी संगीतबारी- प्रमिला लोदगेकर ( 2024), वैशाली वाफळेकर (2025), नाटक – तेजश्री प्रधान (2024), भूषण कडू (2025), कंठसंगीत- धनंजय म्हसकर (2024), मयुर सुकाळे (2025), वाद्यसंगीत- ऋषिकेश जगताप (2024), वरद कठापूरकर (2025), मराठी चित्रपट- मधुरा वेलणकर (2024), शंतनु रोडे (2025),  भारुड/विधीनाट्य/गौळण- हमीद सय्यद (2024)

ज्येष्ठ पुरस्कार : नाटक – अरुण कदम (2025), कंठसंगीत – धनंजय जोशी (2025), वाद्यसंगीत – विजय चव्हाण (2025), मराठी चित्रपट – शिवाजी लोटन पाटील (2025), उपशास्त्रीय संगीत- उदय भवाळकर (2025), किर्तन/समाजप्रबोधन- गहिनीनाथ ज्ञानेश्वर औसेकर महाराज (2025), तमाशा- कोंडीराम आवळे (2025), शाहिरी- शाहिर मधुकर मोरे (2025), नृत्य- श्रीमती रंजना फडके (2025), लोककला- हरिभाऊ वेरुळकर (2025), आदिवासी गिरीजन – रायसिंग हिरा पाडवी (2025), कलादान- चंद्रकांत घरोटे (2025) यांसह अनेकजणांना पुरस्कार मिळाले आहेत. सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी तसेच सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी अभिनंदन केले आहे.