दौंड शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उच्चशिक्षित आणि होतकरू मुलीला संधी द्या.. केंद्र, राज्यातून निधी देण्याचे काम मी करेल – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

अब्बास शेख

दौंड : दौंड शहराचा विकास करण्यासाठी उच्चशिक्षित आणि राजकीय वारसा लाभलेल्या दौंड च्या होतकरू मुलीला संधी द्या. केंद्र, राज्यातून निधी देण्याचे काम मी करेल असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. सर्वांचे विशेष लक्ष असलेल्या दौंड नगरपरीषदेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जाहीर सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.

पुढे अजितदादा यांनी बोलताना, या ठिकाणी कुणी दहशत करु नये. ज्या गावच्या बोरी त्याच गावाच्या बाभळी आहेत हे लक्षात घ्यावे. येथे कुणी दहशत, दमदाटी करु नये. कुणी कायदा हातात घेऊ नये. पोलिसांनी लक्षात घ्यावे कि राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे नियम सर्वांना सारखे लावा. कुणाची दहशत खपवून घेतली जाणार नाही, कुठल्याही समाजाने कुणाला घाबरू नये. आम्ही दोन नंबर धंदेवाल्यांना तिकिटे दिले नाहीत असे अजितदादा आपल्या भाषणात म्हणाले. दौंड मध्ये मोठे शैक्षणिक संकुल उभे करणार असल्याचे यावेळी त्यांनी आवर्जून सांगितले. पुढे बोलताना त्यांनी, ज्या ठिकाणी लोक प्रतिनिधिने लक्ष दिले नाही त्या शहराचा विकास झाला नाही. कारण अधिकारी त्या लोकप्रतिनिधीचे ऐकत असतो असे म्हणाले.

जातपात नंतर आपण अगोदर भारतीय आहोत. दौंड शहरात सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत आहेत. दौंड शहरात येताना मोठे ट्रॅफिक जामिंग दिसले. मी शब्दाचा पक्का असून खरा बोलणारा आहे. जशी मागे पंधरा वर्षे आमची महाविकास आघाडी मात्र काही ठिकाणी स्वबळावर लढत होतो. तसेच यावेळी आमच्या महायुतीमध्ये सुद्धा काही ठिकाणी कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी, प्रभागातील विकासकामे करण्यासाठी स्वबळावर उभे राहिलो आहोत. दौंडचे ६५ व्यापारी येथून स्थलांतरित झाले, हे का झालं, कशामुळे झाले हे पाहावं लागेल आणि इथे कुणी लक्ष देत नाही त्यामुळे हे होत आहे त्यामुळे आम्ही येथे सुशिक्षित, होतकरू आणि राजकीय वारसा असणारी तरुण, तडफदार मुलगी दुर्गादेवी जगदाळे हिला आम्ही संधी दिली आहे आणि इतर नवे जुने नगरसेवक चेहऱ्याचे वेगवेगळ्या समाजाचे उमेदवार दिले आहेत ज्यामुळे दौंडचा विकास करण्यात मोठा हातभार लागणार असल्याचे दादांनी म्हटले आहे.

मला लोकांना फसवायला आवडत नाही, खोटं बोलता येत नाही. आम्ही बारामतीत जी अतिक्रमने हटवली त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही तर त्यांना चांगली मदत केली. दौंडकरांनो मी कुणाला वाऱ्यावर सोडत नाही मी सर्वांना सहकार्य करेल. आप्पा सांगे दादा ऐके असा काहीसा प्रकार येथे आहे. दौंडमध्ये ट्रॅफिक जाम ची समस्या आहे ती सोडवावी लागेल. कुणावर अन्याय होणार नाही. सर्वांना मदत मिळेल असेही त्यांनी येथे म्हटले आहे.

आपल्याला आपल्या दौंडचा विकास करायचा आहे. मी केंद्रातला निधी, राज्यातला निधी येथे आणू शकतो. मी जिल्ह्याचा पालकमंत्री असल्याने येथे निधी देईल मात्र दिलेल्या प्रत्येक पैसा येथे लागला पाहिजे त्याला पाय फुटायला नको त्यासाठी येथे आपला हक्काचा नगराध्यक्ष हवा आहे असे म्हणत दुर्गादेवी जगदाळे ही उमेदवार सुशिक्षित आणि राजकीय वारसा असणारी आहे त्यामुळे तिला निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

या सभेत अजय राऊत, राजन खट्टी, नंदू पवार यांसह विविध वक्त्यांची भाषणे झाली. दुर्गादेवी जगदाळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी दौंड शहरातील काही भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. दौंड नगराध्यक्षपदाच्या उमेदवार दुर्गादेवी जगदाळे तसेच नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार यावेळी व्यासपीठावर आवर्जून उपस्थित होते.

या सभेला माजी आमदार रमेश थोरात, विरधवल जगदाळे, गुरमुख नारंग, वैशाली नागवडे, सोहेल खान, बुवा सावंत, महेश भागवत, नंदूभाऊ पवार, राजन खट्टी, स्वप्निल शहा, नितीन दोरगे, फिरोज खान, नासिर पटेल, हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदुभाऊ पवार यांनी केले.