दौंड नगराध्यक्ष पदासाठी काटे कि टक्कर, क्रॉस वोटिंग कुणाची विकेट काढणार..

अब्बास शेख

दौंड : दौंड नगर परिषदेच्या मतदानाला अवघे दोन दिवस बाकी आहेत त्यामुळे प्रचारही शिगेला पोहोचताना दिसत आहे. दौंड शहरातील अनेक वार्डांमध्ये उमेदवारासमोर एक आणि चर्चेत मात्र दुसरेच नाव असा काहीसा प्रकार सध्या पहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य मतदार हा पॅनल टू पॅनल चालणार का या भीतीने सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढल्याचे दिसत आहे.

आज सभांचा धडाका – आज दि.३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दौंड शहरात दुर्गादेवी जगदाळे व राष्ट्रवादीच्या पॅनलमध्ये उभे असलेल्या उमेदवारांसाठी सभा होत असून आज सायंकाळी ४ वाजता मोनाली वीर आणि नागरिक हित संरक्षण मंडळ, भाजप, मित्र पक्षांच्या उमेदवारांसाठी आमदार राहुल कुल, प्रेमसुख कटारिया यांची सभा होणार आहे.

नगराध्यक्ष आपला व्हावा यासाठी सर्वच पक्षांनी येथे ताकद पणाला लावली आहे. आजी माजी आमदारांनी दौंड शहरात ठाण मांडले आहे. अनेक ठिकाणी किरकोळ बाचाबाची, वादावादी होताना दिसत आहे. खासकरून आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. आमदार राहुल कुल यांसोबत प्रेमसुख कटारिया, बादशहा शेख यांसह दिग्गज मंडळी मैदानात उतरली आहेत तर माजी आमदार रमेश थोरात यांसह विरधवल जगदाळे, सोहेल खान, गुरमुख नारंग आणि त्यांचे दिग्गज जोरदारपणे आपल्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीची धुरा अप्पासाहेब पवार हे सांभाळताना दिसत आहेत. त्यांचे उमेदवार कोमल रुपेश बंड या असून या उमेदवाराचा फटका नेमका कोणाला बसणार हाही औत्सुक्याचा विषय बनला आहे.

दौंड शहरात सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. वार्ड एक ते सात मध्ये घड्याळ आपला जोर कायम ठेवण्यासाठी मेहनत घेताना दिसत आहेत तर राहिलेल्या आठ ते शेवटच्या प्रभागांमध्ये कपाट आणि मित्रपक्ष आपला जोर टिकवून एक ते सातमध्ये मुसंडी मारण्याचा प्रयत्न करत आहेत. या निवडणुकीत दोस्त विरोधक बनले आहेत तर विरोधक हे दोस्त बनले आहेत त्यामुळे कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना पडला आहे हे मात्र नक्की.