सासवड : पुरंदर तालुक्यात वाढत्या अनधिकृत प्लॉटिंग आणि नागरिकांची होणारी फसवणूक यावर (PMRDA) प्राधिकरणाने मोठी मोहीम सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत देवडी, आंबोडी आणि काळेवाडी येथे पीएमआरडीए ची कारवाई करण्यात आली आहे. आता पुढील नंबर दौंडमधील अनधिकृत प्लॉटिंगचा आहे अशी माहिती मिळत आहे.


आत्तापर्यंत पुरंदर तालुक्यातील एकूण १५ गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यापैकी अनधिकृत प्लॉटिंग आढळलेल्या ठिकाणी तात्काळ कारवाई सुरू करण्यात आली आहे. PMRDA च्या या कारवाईत बेकायदेशीर प्लॉटिंगचे निष्कासन करण्यात आले असून या ठिकाणी बेकायदेशीरपणे बनविण्यात आलेले अंतर्गत रस्ते आणि अवैध डिमार्केशन केलेले पोल सुद्धा हटविण्यात आले आहेत.
ही संपूर्ण मोहीम महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असून या कारवाईत अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाच्या सहआयुक्त डॉ. दिप्ती सूर्यवंशी-पाटील, उपायुक्त किरणकुमार काकडे आणि पीएमआरडीएची टीम सहभागी झाली होती.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने सर्वांना सूचना करण्यात येत आहे की नागरिकांनी कोणतीही जमीन खरेदी करण्यापूर्वी तिची कायदेशीर स्थिती तपासूनच निर्णय घ्यावा. अनधिकृत प्लॉटिंगविरोधात पीएमआरडीएची मोहीम पुढेही सुरूच राहणार असल्याचे PMRDA अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.







