School update : शाळेची घंटा वाजली, मात्र विद्यार्थ्यांची शाळेकडे पाठ



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

नववी दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प राहिल्याने शाळांच्या मिशन बिगीन अगेन ला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. दौंड शहरातील सेंट सेबॅस्टियन हायस्कूलमध्ये नववी व दहावी चे पाच विद्यार्थी आज पहिल्या दिवशी उपस्थित राहिले असल्याची ची माहिती शाळेचे मुख्याध्यापक फादर डेनिस जोसेफ यांनी दिली.

करोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन करावा लागल्याने पंधरा जून पासून शाळा बंद पण ऑनलाइन शिक्षण सुरु होते. प्रदीर्घ कालावधीनंतर राज्य सरकारने सुरक्षिततेचे उपाय काटेकोरपणे राबवून शाळा सुरू करण्याचे परिपत्रक काढल्यानंतर पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद मिळाला.

सकाळी आठ वाजता पालकांचे संमतीपत्र असल्याची खातरजमा करून विद्यार्थ्यांचे तापमान व शरीरातील ऑक्सिजनची पातळी ऑक्सीमीटरने तपासून तसेच  सॅनिटायजर हाताला लावण्याच्या सुचना देऊन विद्यार्थ्यांना वर्गात सोडण्यात आले. एका बाकावर एक विद्यार्थी बसण्याची सुविधा करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक जोसेफ यांनी दिली.

दौंड तालुक्यात नववी ते बारावी चे वर्ग असलेले ८४ विद्यालये आहेत. या सर्व शाळांना योग्य ती काळजी घेऊन  शाळा सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र दिलेले आहे.

एकुण विद्यार्थी संख्या १४ हजार ३९६ असून नववी ते बारावी इयत्ता ना शिकवणारे  एक हजार  बत्तीस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तीनशे सत्तर आहेत. यापैकी ४०२ शिक्षकांची करोना  चाचणी झाली असून त्यापैकी एक जण पॉझिटिव्ह आला असून उर्वरित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चाचणी होणे अद्याप बाकी आहे.  दुसरीकडे पालकांचाही विद्यार्थ्यांना शाळांमध्ये पाठवण्याबाबत निरुत्साह दिसून येत आहे.