दौंड : हडपसर-काजीपेट एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा दीड लाख रुपये किमतीचा लॅपटॉप दौंड स्टेशन वरून अज्ञात चोरट्याने लंपास केला होता. या गुन्ह्यातील सराईत अट्टल गुन्हेगार सुमित उमेश गायकवाड (रा. सुरेखा निवास, फादर हायस्कूल जवळ, दौंड) याला लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद करून त्याच्याकडील चोरीतील लॅपटॉप हस्तगत केला असल्याची माहिती दौंड लोहमार्ग पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना 16 सप्टेंबर रोजी दौंड रेल्वे स्थानकामध्ये घडली होती. फिर्यादी दि. 16 सप्टेंबर रोजी हडपसर-काजीपेट एक्सप्रेस ने प्रवास करीत होते. सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान गाडी दौंड रेल्वे स्थानकामध्ये आली असता फिर्यादी नाश्ता घेण्यासाठी स्थानकावरील कॅन्टीन मध्ये गेले. नाश्ता घेऊन ते पुन्हा आपल्या डब्यात आले असता त्यांच्या जागेवर ठेवलेली त्यांची बॅग कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. बॅगेमध्ये दीड लाख रुपये किमतीचा लॅपटॉप होता.
बॅग चोरीला गेल्याने त्यांनी दौंड लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार केली, लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला.
दौंड लोहमार्ग पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा लोहमार्ग पुणे (दौंड युनिट), तसेच राष्ट्रीय सुरक्षा बल (आरपीएफ) खुफिया टीम( पुणे) यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. गुप्त माहितीदार व सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केल्यानंतर सराईत गुन्हेगार सुमित गायकवाड याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले.
दि.10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान सदर आरोपी डिफेन्स कॉलनी( रेल्वे हायस्कूल) परिसरातील जंगलामध्ये लपून बसला असल्याची माहिती खबरी कडून मिळाली असता, पथकाने त्या परिसरात सापळा रचून त्यास शीताफिने जेरबंद केले. पोलीस कोठडी रिमांड मध्ये त्याच्याकडे कसून तपास करीत त्याच्याकडे असलेला दीड लाख रुपये किमतीचा लॅपटॉप हस्तगत केला. आरोपीची पोलीस कोठडी संपल्याने त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्याचा आदेश दौंड लोहमार्ग न्यायालयाने दिला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक इरफान शेख, आरपीएफ पोलीस निरीक्षक भगवान इप्पर यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक मदने, अंमलदार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा लोहमार्ग पुणे, तसेच अंमलदार दौंड लोहमार्ग पोलीस स्टेशन व आर पी एफ खुफीया पथकाने केली.