राज्य उत्पादन शुल्क दौंड विभागाकडून 19 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त, मुख्य सूत्रधार अटकेत

अख्तर काझी

दौंड : दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे परिसरात सापळा रचून परराज्यातून आणलेला आणि महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेला सुमारे १८ लाख ८८ हजार रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधार महावीर लाला रानगट याच्यासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीनंतर रात्रीच्यावेळी एका संशयित हुंडाई वेरना गाडी या पथकाने थांबवून तिची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात गोवा आणि दमण निर्मित अवैध मद्यसाठा आढळून आला होता. यावेळी गाडीतील दोन इसमांना तात्काळ ताब्यात घेण्यात घेण्यात आल्यानंतर पकडलेल्या आरोपींच्या चौकशीतून या रॅकेटचा मुख्य सूत्रधार महावीर लाला रानगट असल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानंतर पथकाने देऊळगाव राजे, तसेच पुणे शहरातील फुरसुंगी आणि सिंहगड रोड येथील रानगटच्या घरांवर व इतर ठिकाणी छापे टाकले. या छाप्यातून विविध नामांकित कंपन्यांच्या व्हिस्कीच्या बाटल्यांचा प्रचंड साठा जप्त करण्यात आला. या संपूर्ण कारवाईत एकूण  १८लाख ८८हजार ४४०/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये विविध ब्रँड्सच्या व्हिस्कीच्या हजारो बाटल्या, गुन्ह्यासाठी वापरलेली ९.५० लाखांची हुंडाई वेरना कार आणि मोबाईल फोनचा समावेश आहे. मुख्य आरोपी महावीर लाला रानगट आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा, १९४९ च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख,  सह-आयुक्त (अंलबजावणी व दक्षता) पी. पी. सुर्वे, मा. विभागीय उप-आयुक्त (पुणे विभाग)  सागर धोमकर, अधीक्षक (राज्य उत्पादन शुल्क, पुणे) अतुल कानडे, व उप-अधीक्षक (हडपसर)  उत्तमराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग व निरीक्षक विजय रोकडे यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक पी. डी. झुंजरुक, मयूर गाडे, ठाकूर, आर. बी. भांगे तसेच जवान डी. जे. साळुंके, केशव वामने, सौरभ देवकर, संकेत वाजे, आणि शुभम भोईटे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक  प्रदीप झुंजरुक हे करत आहेत.