दौंड शहरातील ‘मॉल’मध्ये चिमुकलीसाठी घेतलेल्या कॅडबरीमध्ये आढळले किडे अण बुरशी

दौंड : दौंड शहरातील गोपाळवाडी रोडवर असणाऱ्या एका नामांकित मॉल मध्ये एका पालकाने आपल्या मुलीसाठी घेतलेल्या कॅडबरीमध्ये चक्क किडे अण बुरशी आढळल्याने पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बाळासाहेब अर्जुन गायकवाड (रा.दौंड) यांच्यासोबत हा गंभीर प्रकार घडला असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते गोपाळवाडी रोडवर असणाऱ्या एका मॉलमध्ये आपल्या मुलीसाठी चॉकलेट आणण्यासाठी गेले होते. त्यांनी या मॉलमधून कॅडबरी चॉकलेट घेऊन ते घरी आले आणि आणलेले चॉकलेट मुलीला खाण्यासाठी दिले. यावेळी त्यांच्या मुलीने ते चॉकलेट तोंडात टाकत असताना गायकवाड यांची नजर त्या चॉकलेटवर गेली आणि चॉकलेटची अवस्था पाहून त्यांना धक्काच बसला.

कारण त्या चॉकलेटवर बुरशी आलेली होती आणि त्यावर किडे असल्याचे त्यांनी पाहिले. घडलेला हा सर्व प्रकार त्यांनी त्या मॉलमध्ये जावून सांगितला मात्र मॉलवाल्यांनी हे चॉकलेट अजून एक्सपायर झाले नाही म्हणत आपली जबाबदारी झटकली. आपल्या चिमुकल्या मुलीसोबत आज भयंकर घटना घडली असती याचा विचार करूनच गायकवाड घामाघूम झाले होते. त्यांनी आता याबाबत अन्न व औषध विभागाकडे तक्रार केली असून अन्न व औषध विभाग आता यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.