बीड : सावरगाव येथील भगवान गडावर दसरा सनानिमित्त घेण्यात आलेल्या मेळाव्यामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जोरदार भाषण केले. मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलताना त्यांनी, आम्ही सुद्धा मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अग्रेसर होतो आणि ते आरक्षण मिळेपर्यंत आम्ही भांडलो मात्र आता काहीजण मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे असा अट्टाहास करत असून तो अट्टाहास खुर्चीसाठी आहे आणि तो चुकीचा आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

धनंजय मुंडे यांनी बोलताना, काही ठराविक लोक स्वतःला खुर्ची मिळावी यासाठी आरक्षणाचा मुद्दा पुढे करत आहेत. मात्र याच्या ताटातलं घेऊन त्याच्या ताटात टाकावं असं होणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. प्रत्येक समाजाच्या आरक्षणासाठी मी भांडलो आहे. मी अडचणीत असताना मला पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे या दोन्ही बहिणींचा मोठा आधार मिळाला. माझ्या विरोधात मिडिया ट्रायल सुरु होतं त्यावेळी माझ्या बहिणी माझ्या सोबत खंबीरपणे उभ्या होत्या. बीड मध्ये जातीपातीचं राजकारण होऊ देणार नाही. सर्वांनी सलोख्याने एकोप्याने रहायचं आहे. जातीपातीच राजकारण आपल्याला संपवायचं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
अध्यक्षीय भाषणामध्ये पंकजा मुंडे यांनी चौफेर फटकेबाजी करत उपस्थितांची मने जिंकली. आपण जातीवादाच्या विळख्यातून बाहेर यायला हवं. जातीवादाला कसलाही थारा नको असं म्हणतं त्यांनी, आमच्या लेकरांच्या ताटातलं हिरावून घेऊ नका असा ईशारा आरक्षणावरून जातीवाद करणाऱ्यांना दिला आहे. पुढे बोलताना त्यांनी जातीवाद, धर्मवाद उफाळून येत आहे. जातीवादाच्या भिंती गळून पडल्या पाहिजेत. दोन घास कमी खा पण स्वाभिमानानं रहा असा संदेश उपस्थितांसमोर दिला. या मेळाव्याला आलेल्या काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांनी या कार्यकर्त्यांना चांगलेच झापल्याचे पहायला मिळाले.







