पुणे : सध्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात मात्र आता त्या लाच घेतानाही पुरुषांची बरोबरी करु लागल्या आहेत की काय अशी शंका पुढील प्रकरणातून येत आहे. पुण्यातील हवेली तालुक्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय असणाऱ्या तक्रादाराला तीन महिला तलाठ्यांनी लाच मागून तशी रक्कम स्वीकारताना लाचलूचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रादार यांना हवेली तालुक्यातील सांगरून, बहली, खडकवाडी आणि कडजे या गावाच्या हद्दीतील जमीन खरेदी विक्री करण्यासाठी पुणे शहराच्या लगतच्या प्रस्तावित रिंग रोडमध्ये अधिग्रहित झालेल्या जमिनीच्या 7/12 तसेच 8 अ उताराचे संगणकीकृत आणि हस्तलिखिखित साक्षांकित प्रती हव्या होत्या. त्यासाठी ते सांगरूळ येथे कार्यरत असलेल्या तलाठी क्र. 1) श्रीमती प्रेरणा पारधी, तसेच बहुली येथील तलाठी क्र. 2) श्रीमती दिपाली पासलकर आणि खडकवाडी, कडजे येथील तलाठी क्र. 3) श्रीमती शारदा देवी पाटील यांना भेटले.
त्यावेळी तक्रारदार यांना आवश्यक असलेल्या 7/12 व 8 अ उताऱ्याच्या सांगरुन गावातील 240 प्रतीसाठी तलाठी श्रीमती पारधी यांनी सरकारी फी व्यतिरिक्त रू. 16,400 रुपयांची लाच मागितली, तर बहुली गावातील 106 प्रतिसाठी संबंधित गावच्या तलाठी श्रीमती दिपाली पासलकर यांनी सरकारी फी व्यतिरिक्त 4,910 रुपयांची लाच मागितली व खडकवाडी, कडजे गावातील एकूण 32 प्रतीसाठी त्या गावच्या तलाठी श्रीमती शारदा देवी पाटील यांनीही सरकारी फी व्यतिरिक्त 1520 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदार यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे दिली होती.
तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दि.19/9/2025 रोजी आरोपी लोकसेवक क्र. 1, 2 व 3 यांचेकडे पडताळणी केली असता आरोपी क्र. 1 यांनी तक्रारदाराकडून तक्रारी पुर्वी 4000/- रुपये स्विकारल्याचे कबुल करून आणखी 12.400/- रुपयाची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले तसेच आलोसे क्र. 2 यांनी तक्रारदाराकडे 6500/- रुपये लाच रकमेची मागणी करून ती रक्कम ही आलोसे क्रमांक 1 यांच्याकडे ‘देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले, आलोसे क्र. 3 यांनी तक्रारीपूर्वी तक्रारदाराकडून 1500/- रुपये स्वतःसाठी घेतल्याचे कबूल करून आणखी 2000/- रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
वरील प्रमाणे लाच मागणी पडताळणी केल्यानंतर दि. 25 सप्टेंबर रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक क्र. 3 श्रीमती शारदादेवी पाटील यांना तहसीलदार हवेली यांच्या कार्यालयासमोर रस्त्यावर तक्रारदाराकडून रू.2,000/- (दोन हजार रुपये) लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. वरील तिन्ही महिला तलाठी आरोपिंविरुद्ध खडक पोलीस स्टेशन, पुणे शहर या ठिकाणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.