गटारीचे घाण पाणी थेट घर आणि सोसायट्यांमध्ये, दौंडच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अख्तर काझी

दौंड शहर : दौंड मधील बंगला साईड परिसरातील स्वप्न योग ,स्वप्नसागर, साई, पंचशील, वैभव रेसिडेन्सी, समंथा पार्क, स्वागत, गीतांजली या अपार्टमेंट परिसरातील गटारी तुंबून गटारीतील घाण पाणी थेट या सोसायट्यांमध्ये शिरले आहे. काहींच्या घरात पाणी शिरल्याने त्याच्या उग्र वासाने घरात थांबणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे या अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी नगरपालिकेला निवेदन देऊन काहीतरी उपाययोजना करा अशी मागणी केली आहे.

या भागातील परिस्थिती बिकट बनत चालली आहे. कचरा आणि गाळ अडकून डिफेन्स कॉलनी मधील मुख्य सांडपाण्याच्या अंतर्गत ड्रेनेची लाईन तुंबल्याने ती बंद झालेली आहे. अनेक ठिकाणी ड्रेनेजचेंबर तुटलेले आहेत. तसेच गटारीतील पाण्याचा निचराच बंद झाल्याने ते घाण पाणी परिसरातील रस्त्यावरून वाहत आहे. आसपासच्या सोसायट्यांमध्ये शिरले आहे. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असून घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले आहे.

गटारीचे घाण पाणी जमिनीमध्ये झिरपत असल्याने परिसरातील बोअर दूषित झाले आहेत. अशा परिस्थितीमुळे स्थानिकांमध्ये आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नगरपालिकेने परिसरातील तुंबलेल्या गटारी दुरुस्त कराव्यात व परिसर तसेच सोसायट्या स्वच्छ कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.