दौंड मध्ये वाहतूक पोलीस ॲक्शन मोडवर, शहरात दुचाकीवर टुकारगिरी करणाऱ्यांवर कारवाई

अख्तर काझी

दौंड : दौंड शहरातील प्रमुख चौकांमध्ये तसेच शाळा, कॉलेज परिसरात दुचाकीवर टुकारगिरी करणाऱ्या युवकांवर तसेच अल्पवयीन चालकांविरोधात दौंड पोलीस स्टेशनच्या वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. त्याचप्रमाणे आपल्या बुलेट गाडीला कर्ण कर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून शहरात हिरोगिरी करणाऱ्यांवर सुद्धा पोलिसांनी कारवाई केली आहे.

पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना गाड्या देऊ नयेत, कारवाई दरम्यान जर अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना सापडल्यास त्यांच्या पालकांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
शहरातील शाळा ,कॉलेज, बाजारपेठ परिसरात रोड रोमिओ दुचाकींवर येऊन मुलींची छेडछाड करतात.

दुचाकी मुलींच्या अंगावर घालणे, मुलींच्या शेजारून जाताना कर्ण कर्कश हॉर्न वाजविणे असे प्रकार रोड रोमियो करीत असल्याच्या तक्रारी येत असल्याने पोलिसांनी कारवाई केली आहे. सध्या सण, उत्सवाचे दिवस आहेत त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच बाजारपेठेत बेशिस्तपणे गाड्या पार्किंग करून वाहतूक कोंडी करणाऱ्यांवर सुद्धा पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल करमचंद बंडगर तसेच वार्डन आकाश शिंदे या पथकाने केली.