अख्तर काझी
दौंड : उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर येथे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर जयंती निमित्ताने निघालेल्या जुलूस मध्ये आय लव मोहम्मद असा मजकूर असलेले बोर्ड घेऊन सामील झालेल्या वीस युवकांवर कानपूर पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याचा आरोप दौंड शहरातील मुस्लिमांनी करत या घटनेचा निषेध केला. कानपुर पोलिसांचे हे कृत्य संविधान विरोधी असल्याचेही यावेळी मुस्लिम समाजाने म्हटले असून याबाबत दौंड पोलिसांना निषेधाचे निवेदन देण्यात आले आहे.
दौंड पोलीस प्रशासनाला निषेधाचे निवेदन देतेवेळी मौलाना हरून हाफिज, शाही आलमगीर मशिदीचे विश्वस्त युसुफ इनामदार, माजी नगराध्यक्ष बादशहा शेख, माजी नगरसेवक वसीम शेख, शहानवाज पठाण, मतीन शेख, शौकत सय्यद, तज्जमुल खान, इसामुद्दिन मन्यार, भारत सरोदे, मोजेस पॉल, अज्जू सय्यद, अकबर शेख, अल्ताफ सय्यद, शाहिद पानसरे अकबर इनामदार, चांद शेख तसेच अन्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.
निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, दि.4 सप्टेंबर 2025 रोजी उत्तर प्रदेश मधील कानपूर येथे ‘आय लव मोहम्मद’ असा मजकूर असलेला बोर्ड झळकावीत असलेल्या 20 युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुस्लिम समाजामध्ये भय निर्माण करण्याकरिता पोलिसांनी हे कृत्य केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही गळचेपी आहे, पोलिसांचे सदरचे कृत्य भारतीय संविधाना विरुद्ध असून दौंड मधील समस्त मुस्लिम समाज आणि बहुजन समाज या घटनेचा निषेध करत आहे. कोणताही अपराध न केलेल्या युवकांवर पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा मागे घेण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.