दिल्ली : बॉलिवूड ची प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी हिच्या बरेली येथील घरावर गोळीबार करणारे दोन आरोपी दिल्ली पोलिसांच्या एनकाउंटर मध्ये ठार झाले आहेत. हे दोन्ही आरोपी गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा टोळीचे सक्रिय सदस्य होते.
मिळत असलेल्या माहितीनुसार आरोपींनी दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करत दहशत माजविण्याच्या प्रयत्न केला होता. एनकाउंटर मध्ये ठार झालेल्या आरोपिंमध्ये रवींद्र कल्लू हा रोहतकमधील येथील रहिवासी होता तर राजेंद्र अरुण हा सोनीपतमधील गोहना रोड इंडियन कॉलनी येथील रहिवासी होता. कल्लू आणि अरुण ही या आरोपिंच्या वडिलांची नावे आहेत.
अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा तपास स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) करत होती. या तपासादरम्यान, दोन्ही गुन्हेगार सोनीपत मार्गे लोणी परिसरात येत असल्याचे टीमला समजले. नोएडा एसटीएफ युनिट, दिल्ली सीआय आणि सोनीपत टीमने गाझियाबाद पोलिसांच्या मदतीने गुन्हेगारांचा पाठलाग करत त्यांना वेढले होते.
स्वतःला वेढलेले पाहून गुन्हेगारांनी पोलिस पथकावर गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तर देताना केलेल्या गोळीबारात दोन्ही गुन्हेगारांना गोळ्या लागून ते जमिनीवर पडले. पोलिसांनी त्यांना तातडीने लोणी येथील सरकारी रुग्णालयात नेले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सलमान खान याच्या घरावर गोळीबार केल्यानंतर ही गँग पुन्हा चर्चेत आली होती. यानंतर त्यांनी सलमान खान सोबत काम करणाऱ्या, जवळीक साधणाऱ्यांना धमकाविण्याचे सत्र सुरु केले आहे. यातूनच अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरावर सुद्धा हल्ला करण्यात आला होता असे सांगितले जात असून यातील दोन्ही आरोपिंचा एनकाउंटर झाल्यानंतर आता गुन्हेगारांना चपराक वसेल असे बोलले जात आहे.