Daund : नांदेड बलात्कार प्रकरणी लहुजी शक्तीसेनेकडून दौंडमध्ये निषेध



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

नांदेड जिल्ह्यातील बिलोरी येथील मातंग समाजाच्या मुकबधिर मुलीवर अत्याचार करून तिला दगडाने ठेचून जीवे मारण्यात आल्याची घटना घडत नाहीत तोच बेळगाव येथील महिलेवरही भर बाजारपेठेत ॲसिड हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आल्यानंतर या घटनांचा दौंड लहुजी शक्ती सेनेच्या वतीने दौंड येथे तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. 

संघटनेच्यावतीने यावेळी दौंड पोलिसांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. संघटनेचे पदाधिकारी विक्रम अडागळे, अक्षय मोरे, नरेश ससाने, अमित मोरे, पांडुरंग गडेकर, धरम बनसोडे,सागर लोखंडे, तसेच योगिता रसाळ आदी यावेळी उपस्थित होते. 

दि.9 डिसेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील बिलोरी गावामध्ये राहणाऱ्या एका 27 वर्षीय मूकबधिर मुलीच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केला व नंतर तिचा दगडाने ठेचून निर्घृण खून केला.

या  नराधमा सोबत या कांडामध्ये त्याचे आणखीन कोणी साथीदार सहभागी होते का याची पोलिसांनी कसून चौकशी करावी तसेच सदरचा खटला जलदगती न्यायालयासमोर चालविला जावा व नराधमांना फाशीचीच शिक्षा देण्यात यावी अशी मागणी लहुजी शक्ती सेनेने निवेदनातून केली आहे. 

त्याच प्रमाणे रायबाग (जिल्हा, जळगाव) येथील भाजी विक्रेत्या महिलेवर भर चौकात ॲसिड हल्ला करून निर्दयीपणे जाळण्यात आले. या प्रकरणातील आरोपीला सुद्धा कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून पीडितांना न्याय मिळावा अन्यथा लहुजी सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.