Daund – नगरपालिका ठेकेदार चालवीत आहेत! : मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांचा संताप. मुजोर ठेकेदारांविरोधात शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

दौंड नगरपालिका पालिकेतील ठेकेदार चालवीत आहेत असे गंभीर वक्तव्य खुद्द मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांनी केले आहे. त्यामुळे शहरात मनमानी पद्धतीने काम करणाऱ्या ठेकेदारां समोर सामान्य नागरिकांसह नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुद्धा हतबल झाल्याचे चित्र सध्या दौंड नगर पालिकेत पहावयास मिळत आहे.

शहरातील अनेक प्रभागात अर्धवट असलेली कामे, सर्वत्र घाणीचे साम्राज्य, शहरात फिरणारी मोकाट जनावरे व त्यांचा सामान्यांना होणारा त्रास या शहरातील परिस्थिती विरोधात दौंड शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस व मनसे दिनांक 16 डिसेंबर रोजी नगर पालिकेसमोर जागरण गोंधळ आंदोलन करणार आहे. 

या आंदोलनाचे निवेदन देण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी राशिनकर यांची भेट घेतली. शहरातील नगर पालिकेच्या कारभाराच्या तक्रारी ऐकून घेतल्या नंतर मुख्याधिकारी म्हणाल्या की, सध्या नगरपालिका येथील ठेकेदार चालवीत आहेत अशी परिस्थिती आहे आणि  या सर्व गोष्टींची मी  नगरसेवकांना कल्पना सुद्धा दिलेली आहे.

खुद्द मुख्याधिकारी मुजोर ठेकेदारांसमोर हतबल झाले असल्याचे पाहून सर्वांनीच या  गोष्टीचा खेद व्यक्त केला. मुख्याधिकारी यांच्या  या गंभीर विधानामुळे नगरपालिकेतील कामकाजाचा किती बोजवारा उडाला आहे हेच चव्हाट्यावर आले आहे. शिवसेना राष्ट्रवादी युतीचे नगरपालिकेत 24 पैकी 14 नगरसेवक असताना सुद्धा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या तक्रारींकडे नगरपालिका प्रशासन व नगरसेवक दुर्लक्ष करीत आहेत.

त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे असे शिवसेना पदाधिकारी अनिल सोनवणे व  संतोष जगताप यांनी सांगितले. शिवसेनेने नगरपालिकेतील युतीला घरचा आहेर द्यायचा तरी किती वेळेला यावर सध्या चर्चा रंगली आहे. शिवसेना, काँग्रेस, मनसे पक्षाचे पदाधिकारी व  कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.