जो म्हणेल ‘शादी मे जरुर आना’ त्याला चपलेने हाणा..

अब्बास शेख

बातमीची वरील हेडलाईन वाचून तुम्ही नक्कीच चक्रावला असाल, पण वेगळा विचार करण्या अगोदर थोडं थांबा आणि जो म्हणेल ‘शादी मे जरुर आणा’ त्याला ‘चपलेने हाणा’ अशी म्हणण्याची वेळ काहींवर का आली आहे हे ज्यावेळी तुम्ही जाणून घ्याल तेव्हा तुम्ही सुद्धा अश्यांना दोन तरी चपला हाणाच असे म्हटल्याशिवाय राहणार नाही.

सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. जो तो आपल्या घरी आयोजित केलेल्या लग्न, वाढदिवस, बारसे, जागरण गोंधळ अश्या कार्यक्रमांचे आमंत्रण आता व्हाट्सअप आणि विविध मेसेंजर ॲप ने देत असतो. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, घरोघरी जावून आमंत्रण देण्यात जो वेळ आणि गाडीचा पैसा वाया जातो तो पूर्णपणे या मेसेंजर ॲप मुळे आता वाचू लागला आहे. मोठमोठ्या हाय प्रोफाईल व्यक्तींच्या लग्नाच्या पत्रिका सुद्धा आता याच मेसेंजर ॲप ने पाठवल्या जात असून त्यामुळे हजारो रुपयांची बचत होऊ लागली आहे. मात्र म्हणतात ना की ज्या गोष्टी फायद्यासाठी बनवलेल्या असतात त्याचे काही तोटेही असतात आणि या मेसेंजर ॲप चे सुद्धा तसेच काहीसे होऊ लागले आहे.

आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की, जुन्या काळात चोर एखाद्या रस्त्यावर दबा धरुन बसायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवून त्यांच्या जवळील सोने नाणे, पैसे लुटायचे. तसाच काहीसा प्रकार आता व्हाट्सॲप आणि विविध सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर सुद्धा होऊ लागला आहे. सोशल मिडियावर आता हॅकर सुद्धा दबा धरून बसलेले असतात आणि लोकांना लुटण्याच्या विविध कल्पना ते लढवत असतात. सोशल मीडियावरील या चोरट्यांनी म्हणजेच हॅकर्सनी आता अनेक व्यक्तींना ‘शादी मे जरुर आणा’ असे मेसेज आणि त्याची इमेज लिंक तयार करून पाठवायला सुरुवात केली आहे.

हॅकरचे जुने फंडे ओळखून असणारे लोक या प्रकरणात मात्र घाई करताना दिसतात आणि इमेज लिंक आली की ती कोणत्या नंबरवरून आली आहे, ती एपिके (apk) फाईल आहे का हे न पाहता ती इमेज किंवा लिंक ओपन करून टाकतात आणि त्यामुळे हॅकर चे काम एकदम सोपे होऊन जाते. एकदा का ती लिंक ओपन केली की मोबाईल हॅक होऊन जातो आणि त्या मोबाईलवरून मग त्या व्यक्तीचे बँक खाते रिकामे करणे, लोकांना पैशांची मागणी करणारे मेसेज पाठवणे आणि अश्लील फोटो आणि व्हिडीओ विविध ग्रुपवर शेअर करणे असले प्रकार सुरु होतात.

जोपर्यंत त्या व्यक्तीच्या लक्षात ही बाब येते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि लोक त्याला ज्यावेळी दुसऱ्या नंबरवर फोन करून विचारतात की अहो तुम्ही मला पाठवलंय की ‘शादी मे जरुर आणा..’ तर त्याचे उत्तर असते त्या मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही ‘जोड्याने हाणा..’

त्यामुळे मित्रांनो तुम्हाला जर अशी कोणती लिंक किंवा इमेज आली तर ती अगोदर apk फाईल तर नाही ना याची खात्री करा आणि मगच लिंक ओपन करा अन्यथा वरील वाक्य म्हणण्याची पुढची बारी तुमची असेल यात शंका नाही.