दौंड भूमी अभिलेख कार्यालयात लाच घेताना महिला अधिकाऱ्यासह दोघांना अटक, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

अब्बास शेख

दौंड : दौंड भूमी अभिलेख कार्यालयात लाच घेताना एक महिला अधिकारी आणि एक खाजगी सर्वेयरला लाचलूचपत विभागाच्या टीमने रंगेहात पकडले आहे. वैशाली चंद्रकांत धसकटे (रा.केडगाव, पद- परीक्षण भुमापक, दौंड भूमिअभिलेख कार्यालय) आणि फय्याज दाऊद शेख (रा. पानसरे वस्ती दौंड, पद- खाजगी सहाय्यक सर्वेयर) अशी या दोन आरोपिंची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार हे शेतकरी असून त्यांच्या वडिलोपार्जित जमिनीचा वाटपाचा दावा दौंड सिविल कोर्टात चालू होता. त्या दाव्यामध्ये कोर्टाने तक्रारदाराच्या सामायिक जमिनीचा हिस्सा ठरवून मा. जिल्हाधिकारी यांना जमिनीचे वाटप करून घेण्याबाबत आदेशीत केल्यानंतर तहसीलदार, दौड यांनी उपाधीक्षक भूमी अभिलेख, दौड यांना तक्रारदाराच्या सामायिक जमिनीची मोजणी करून वाटप तक्ता सादर करण्याकरीता आदेशित केले होते.

त्याप्रमाणे ते प्रकरण उपाधीक्षक भूमी अभिलेख दौंड यांच्याकडे आल्यानंतर तक्रारदाराच्या सामायिक जमिनीची मोजणी यातील आरोपी लोकसेवक वैशाली धसकटे यांनी केली होती. तक्रारदाराच्या सामायिक जमिनीची केलेल्या मोजणीचा अहवाल आणि वाटप तक्ता तयार करून उपाधीक्षक भूमि अभिलेख दौंड यांची सही घेऊन तो प्रस्ताव तहसीलदार, दौँड यांना सादर करण्याकरता व तक्रारदारास ‘क’ प्रत देण्याकरिता यातील आरोपी लोकसेविका श्रीमती धसकटे यांनी तक्रारदाराकडे 15,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

लाचेची मागणी करण्यात आल्याने त्याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी दि04/08/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांच्याकडे केली होती. तक्रारदाराच्या वरील तक्रारीच्या अनुषंगाने दि.11/08/2025 रोजी पडताळणी कारवाई केली असता लोकसेवक श्रीमती वैशाली धसकटे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडे त्यांचे वरीलप्रमाणे काम करून देण्यासाठी सुरुवातीस 15,000/- रुपयांची लाच मागून तडजोडीअंती 14,000/- रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

त्यामुळे वरीलप्रमाणे लाच मागणी पडताळणी केल्यानंतर आज दिनांक 20/08/2025 रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेविका श्रीमती धसकटे यांचे सांगण्यावरून आरोपी क्र. 2 फय्याज शेख यांनी तक्रारदाराकडून त्यांच्या वरीलप्रमाणे कामासाठी उपाधीक्षक भूमी अभिलेख, दौंड यांच्या कार्यालयाच्या आवारात 10,000/- रुपयांची लाच स्विकारली असता दोन्ही आरोपिंना ताब्यात घेण्यात येऊन वरील दोन्ही आरोपी विरुद्ध दौंड पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण या ठिकाणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक श्री.शिरीष सरदेशपांडे, (ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे) व अपर पोलीस अधीक्षक श्री. अजीत पाटील, (ला.प्र.वि. पुणे) यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

आवाहन – अधिकारी, कर्मचारी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लोकसेवक, शासकीय किवा खासगी इसम (एजंट) कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील क्रमांकवर सपर्क साधण्याचे आवाहन श्री शिरीष सरदेशपांडे, (पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे) तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. अजीत पाटील, (लाप्र.वि.पुणे) यांनी केले आहे.