आग्रा ते रायगड असा 1310 किमी पदयात्रा व सायकल रॅली अभियानाचा प्रारंभ, अतिथी आ.राहुल कुल यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती

आग्रा (विशेष प्रतिनिधी) : आज १७ ऑगस्ट रोजी १६६६ या ऐतिहासिक ‘शिवचातुर्य दिना’च्या ३५८ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून गरुड झेप मोहीम संस्थेच्या वतीने आग्रा ते रायगड अशा १३१० किमी पदयात्रा व सायकल रॅली अभियानाचा भव्य प्रारंभ करण्यात आला. या प्रेरणादायी कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेच्या धाडसाचे व स्वाभिमानाचे स्मरण करण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मराठी भाषा व सांस्कृतिक कार्यमंत्री डॉ. आशिष शेलार, उत्तर प्रदेशचे उच्चशिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, दौंड भाजप आमदार ॲड. राहुल कुल, भाजप महिला मोर्चा राज्य उपाध्यक्षा सौ. कांचन कुल, भाजपा आमदार संजय उपाध्याय हे उपस्थित होते. विशेष अतिथिंच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

या कार्यक्रमाला संयोजक मारुती गोळे, अभय गोटे व अध्यक्ष राकेश विलासराव विधाते यांसह अनेक पदाधिकारी, स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ऐतिहासिक पदयात्रेनिमित्त आयोजकांनी शिवाजी महाराजांच्या आदर्शांनुसार सामाजिक एकता, स्वाभिमान व राष्ट्राभिमान यांच्या जोपासनेचा संकल्प व्यक्त केला.