दौंड : दौंड तालुक्यातील बोरिपार्धी-चौफुला येथील प्रसिद्ध असलेले हॉटेल रघुनंदन ला बुधवार दि.२३ जुलै रोजी रात्री सव्वादोन च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी आगीचे दोन बंब बोलविण्यात आले होते. अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.
प्रथम दर्शनी तर ही आग शॉर्ट्सर्किटमुळे लागली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगीमध्ये सुमारे एक कोटी रुपयांच्या आसपास आर्थिक नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. या सुप्रसिद्ध हॉटेल चे मालक रघुनाथ सरगर यांच्याशी सहकारनामा प्रतिनिधिने बातचीत केली असता ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. या आगीमध्ये हॉटेल मधील सर्व मौल्यवान फर्निचर, सोफे, फ्रिज, टेबल, खुर्च्या, पीओपी आणि आतील सर्वच सामान तसेच शोभेच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत.
रघुनाथ सरगर हे या परिसरात एक शांत, सय्यमी व्यक्तिमत्व असून ते एक चांगले उद्योजक म्हणून ओळखले जातात. मोठ्या कष्टातून त्यांनी आपले हॉटेल विश्व उभारले आहे. अचानकपणे घडलेल्या या आगीच्या घटनेमुळे त्यांच्या हॉटेलचे सुमारे एक कोटींच्या आसपास नुकसान झाले आहे. अश्या अचानक घडलेल्या घटनांमुळे व्यवसायिकांचे मोठे नुकसान होते त्यामुळे शासनाने या ठिकाणी आर्थिक मदत करून व्यवसायिकांना नवसंजीवनी देणे गरजेचे आहे.