दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)
कोरोना महामारीच्या कार्यकाळात महामारी वरील नियंत्रणासाठीच्या उपाय योजनांची गावामध्ये जनजागृती करणे, अंमलबजावणी करून घेणे, या दिवसांमध्ये गावामध्ये नव्याने आलेल्या व्यक्तींची माहिती पोलीस प्रशासनाला देणे तसेच वेळ प्रसंगी रात्रीच्या वेळेस गावातील ग्राम सुरक्षा दल सदस्यांना साथीने घेऊन गस्त घालणे आदी कामे उत्तम रित्या पार पाडणाऱ्या पोलीस पाटलांचा सन्मान दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक पालवे, लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील यांना प्रशस्ती पत्रके देण्यात आली.
पुणे जिल्हा ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून दौंड पोलिसांनी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. उपस्थित पोलीस पाटलांना मार्गदर्शन करताना पो.नि. पवार म्हणाले की, प्रत्येक पोलीस पाटील यांनी निरपेक्ष पद्धतीने काम करून गावातील, घटनेतील वस्तुस्थितीची माहिती पोलीस प्रशासनाला देणे गरजेचे आहे. तसेच आगामी ग्रामपंचायत निवडणुकी बाबतच्या कामांच्या सूचनाही पवार यांनी यावेळी दिल्या. उपस्थित पोलीस पाटील यांनीही यावेळी आपल्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या.
कोरोना काळात जवळपास 20 पोलीस पाटील यांना कर्तव्य बजावीत असताना मृत्यू आला आहे. त्यांच्या कुटुंबाला शासनाने प्रत्येकी 50 लाखांची मदत केली पाहिजे. तसेच काही प्रसंगी राजकीय नेते एखाद्या घटने प्रसंगी आमच्या उपस्थितीला हरकत घेतात त्यामुळे पोलीस प्रशासनाने आम्हाला आमच्या अधिकाराबाबत व कामाबाबत लेखी पत्र द्यावीत अशी मागणी करण्यात आली.