अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमास दौंड न्यायालयाने ठोठावली इतक्या दिवसांची पोलीस कोठडी

अख्तर काझी

दौंड : मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असून सुद्धा तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे वारंवार लैंगिक शोषण करणाऱ्या जय कमल मोटवाणी या आरोपीस दौंड न्यायालयाने 21 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबतची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जय कमल मोटवाणी (वय 25,रा. जनता कॉलनी, बंगला साईड, दौंड) याने ऑगस्ट 2024 ते फिर्याद दाखल होण्याच्या 15 दिवसांपूर्वी पर्यंत पीडिता अल्पवयीन असल्याचे माहित असून सुद्धा तिला लग्नाचे आमिष दाखवून, तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने दौंड पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी जय कमल मोटवानी विरोधात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण( पोक्सो) अधिनियम 4,6 कलमा सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या.

पुणे शहरालगत असणाऱ्या बोपदेव घाटात मित्राबरोबर फिरावयास आलेल्या मुलीवर सामूहिक बलात्कार, पुणे येथील स्वारगेट बस स्थानकावर प्रवासासाठी आलेल्या मुलीवर बस मध्येच बलात्कार, कलकत्ता येथील मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थिनीवर बलात्कार या संतापजनक घटना दौंडकरांना वर्तमानपत्रात वाचायला मिळत होत्या. मात्र आता अशा घटना दौंड शहर व तालुक्यातही घडू लागल्याने पालक वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे.

अशा घटनेतील नराधमांना कमीत कमी वेळेत व जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी म्हणून पोलीस प्रशासनाने आपल्या परीने प्रयत्न करावेत अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त करण्यात येत आहे.