केडगाव, दौंड : (अब्बास शेख) दौंड तालुक्यातील केडगाव-आंबेगाव पुनर्वसन येथे एका ११ महिन्याच्या बालकाचा त्रिशूल डोक्यात मारून खून झाल्याची भयानक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन मेंगावडे आणि त्याची पत्नी पल्लवी मेंगावडे यांच्यामध्ये जोरदार भांडण सुरु होते. यावेळी पल्लवी हिने आपल्या हातातील त्रिशूलाने नितीन याला मारण्याचा प्रयत्न केला मात्र हा त्रिशूल नितीन याने चुकविल्याने तो शेजारी भावजय भाग्यश्री हिच्या कडेवर असणाऱ्या भाग्यश्री हिच्या ११ महिन्याच्या अवधूत या मुलाच्या डोक्यात घुसला. त्रिशूलाचा प्रहार इतका भयंकर होता की यात ११ महिन्याचा अवधूत याला यात मोठी इजा झाली. यानंतर त्यास त्वरित रुग्णालयात हलविण्यात आले यावेळी डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपी पल्लवी तिचा नवरा नितीन यांना ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे. कोणतीही चूक नसताना या ११ महिन्याच्या बालकाला आपला जीव गमवावा लागल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.