स्वामी चिंचोली प्रकरणातील दोन संशयीत पोलिसांच्या ताब्यात

दौंड : दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावाजवळ प्रवाश्यांना लुटून त्यातील एका साडे सोळावर्षीय अल्पवयीन मुलीवर अमानुषपणे बलात्कार करण्यात आला होता. यातील दोन संशयीत नराधमांना आता पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. या आरोपिंना पकडण्यासाठी पोलिसांची पाच पथके अहोरात्र शोध घेत होती. आता या संशयीत आरोपिंना पकडण्यात पोलिसांना यश आले असून एक आरोपी हा माळशिरस जि. सोलापूर तर दुसरा आरोपी भिगवण जि. पुणे येथील असल्याची माहिती मिळत आहे. पुढील संपूर्ण माहिती पुणे ग्रामिण पोलिस अधीक्षक यांच्याकडून लवकरच देण्यात येणार आहे

काय घडले होते – पंढरपूरच्या दिशेने वारीकडे निघालेल्या भाविकांना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली या गावाजवळ कोयत्याचा धाक दाखवून या भक्तांची लूटमार करण्यात आली होती. यावेळी सुमारे दिड लाखांच्या ऐवजाची चोरी करण्यात येउन एका साडे सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या भयानक घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलिसांची पाच पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली होती.

आमदार राहुल कुल यांचा पाठपुरावा – ही धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडली होती त्यामुळे दौंडचे आमदार राहुल कुल यांनी महाराष्ट्र विधानसभेत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, त्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि या घटनेतील पीडितांना त्वरित न्याय मिळावा यासाठी खटला जलदगती (फास्ट ट्रॅक) न्यायालयात चालवावा अशी मागणी केली होती.