बेसबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पुणे जिल्ह्यास दुहेरी मुकुट

दौंड : संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती येथे 18 व्या खुल्या राज्यस्तरीय अजिंक्यपद बेसबॉल स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेत पुणे जिल्हा संघाने दुहेरी मुकुटाचा मान मिळविला. पुण्याच्या पुरुष संघाने अंतिम सामन्यात मुंबई शहरावर 13/3 होमरन ने विजय मिळविला तर महिला संघाने अंतिम सामन्यात सातारा संघावर 5/1 होमरन ने विजय मिळवित पुणे जिल्ह्यास प्रथमच दुहेरी मुकुटाचा मान मिळवून दिला.

पुरुष संघाने साखळी ते उपांत्य सामन्यांमध्ये यवतमाळ ,मुंबई उपनगर, अमरावती व ठाणे या संघांवर मात केली. महिला संघाने भंडारा, अहिल्यानगर, परभणी, बीड व ठाणे संघावर मात केली. पुरुष व महिला संघाच्या कर्णधार पदाची धुरा अनुक्रमे शिवराज शिंदे व प्रियंका लांडगे यांनी उत्तमरीत्या पार पाडली. महिला संघातून शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त रेश्मा पुणेकर व विद्या गिरी तसेच पुरुष संघामध्ये स्वप्निल नरुटे, संतोष कचरे, प्रतीक गायकवाड व भुवन खंडाळे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. पुरुष संघास सुमित दळवी व महिला संघास रोहित ठाकोर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

सदर स्पर्धेची निवड चाचणी दौंड शहरातील कामगार मैदान येथे पार पडली. खुल्या बेसबॉल राज्य अजिंक्यपद स्पर्धेचा करंडक महाराष्ट्र बेसबॉल संघटनेचे सचिव राजेंद्र इखनकर व उपाध्यक्ष इंद्रजीत नितीनवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदर प्रसंगी अजय देशमुख (सचिव-जळगाव) ज्ञानेश काळे (सचिव- सातारा) संतोष खेंडे (सचिव -सोलापूर) अशोक देवकर उपस्थित होते. पुणे जिल्हा बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांनी दोन्ही विजेत्या संघाचे अभिनंदन केले.