श्रीगोंद्याचे तलाठी आणि तरुणीचा मृतदेह जुन्नरच्या दरीत सापडला

पुणे : जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात दुर्गावाडी येथील कोकणकडा परिसरातील सुमारे 1200 फूट खोल दरीत तरुण आणि तरुणी अशा दोघा जणांचे मृतदेह आढळले आहेत. या घटनेने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. दोघांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. मयतामध्ये श्रीगोंद्याचे तलाठी आणि एका महाविद्यालयीन तरुणीचा समावेश आहे.

रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40 वर्ष) असे या तलाठ्याचे नाव आहे. त्यांच्यासोबत एक महाविद्यालयीन युवतीचा सुद्धा मृतदेह झालेल्या आढळला असल्याची माहिती जुन्नर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली आहे. वरील दोघांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून खोल दरिमध्ये उतरून जुन्नर पोलिस आणि रेस्क्यू टीमने मोठ्या अडचणीतून जाऊन हे मृतदेह दरीतून बाहेर काढले आहेत.

पोलिसांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा येथे काम करणारे तलाठी रामचंद्र पारधी हे मूळ दुर्गावाडीचे आहेत. काही दिवसांपासून ते कुणाला काही न सांगता अचानक बेपत्ता झाले होते. त्यामुळे अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात त्यांच्या पत्नीने तक्रार सुद्धा दिली होती. तसेच एक महाविद्यालयीन तरुणी सुद्धा काही दिवसांपासून बेपत्ता होती त्याबाबत अपहरणाचा गुन्हा जुन्नर पोलिस ठाण्यात दाखल होता.

असा लागला तपास – जुन्नर येथील ग्रामस्थांनी एक पांढऱ्या रंगाची गाडी काही दिवसांपासून जुन्नर येथे असणाऱ्या रिव्हर्स वॉटर फॉलजवळ संशयास्पदरीत्या उभी असल्याचे पाहिले. याबाबत संशय बळावल्याने शोधाशोध सुरु झाली असताना तेथील कड्याच्या टोकावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला त्यांना दिसून आल्या. त्यामुळे येथे काहीतरी भयंकर घडले आहे सर्वांच्या लक्षात आले आणि सोमवार दिनांक 23 जून रोजी सकाळी रेस्क्यू टीम बोलविण्यात येउन दरीत उतरून शोध कार्य सुरु झाले. यावेळी श्रीगोंद्याचे तलाठी रामचंद्र आणि अपहरण झालेल्या तरुणी यांचे मृतदेह आढळून आले. या दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात रेस्क्यू टीम आणि पोलिसांना मोठ्या अडचणी आल्या मात्र शेवटी या दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश येउन ते शवविच्छेदणासाठी पाठविण्यात आले आहेत. चाळीसवर्षीय तलाठी आणि महाविद्यालयीन तरुणी यांचे मृतदेह सापडल्याने जुन्नर आणि श्रीगोंदामध्ये एकच खळबळ माजली आहे. पुढील तपास जुन्नर पोलिस करत आहेत.