श्री धनाजी शेळके कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांकडुन आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

वाखारी (दौंड) : दौंड तालुक्यातील वाखारी येथे असणाऱ्या श्री धनाजी शेळके कॉलेज ऑफ फार्मसी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या एनएसएस विभाग, विद्यार्थी विकास मंडळ आणि क्रीडा विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

योगा कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०:३० वाजता दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी योगदिनाचे महत्त्व सांगणारे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी धनशोभा फाऊंडेशन संस्थेचे अध्यक्ष श्री.धनाजी शेळके, सचिव सौ.राधिका शेळके, संचालक सौ.शोभा शेळके, प्राचार्य डॉ.संतोष वाघमारे, विभाग प्रमुख प्रा. विकास गडधे व सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा विशेष योग एस व्यासा इंटरनॅशनल योगा युनिव्हर्सिटी बेंगलोर च्या प्रशिक्षक सौ.शोभा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. विविध योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार व ध्यानधारणा यांचे सत्र आयोजित करण्यात आले. योगाचे सत्र सर्व सहभागींसाठी प्रेरणादायी व उत्साहवर्धक ठरले.

फार्मसी कॉलेजचे अध्यक्ष श्री.धनाजी शेळके यांनी आपल्या भाषणात सांगितले, योग ही केवळ व्यायामाची पद्धत नसून ती एक जीवनशैली आहे. निरोगी जीवनासाठी योगाचा अंगीकार आजच्या पिढीने करणे अत्यावश्यक आहे. कार्यक्रमाच्या शेवटी सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण सचिन राधिका शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. “योग करा, आरोग्य वाढवा” या घोषवाक्याने कार्यक्रमाची सांगता झाली.