भयानक | जेजुरी-मोरगाव रस्त्यावर कार चा भीषण अपघात.. 8 ठार 5 जखमी, मृतांची ओळख पटली

बारामती / पुरंदर : जेजुरी-मोरगाव रस्त्यावर बुधवारी रात्री 07:15 च्या दरम्यान कार आणि मालवाहतूक पीकअप मध्ये भीषण अपघात होऊन यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची भयानक घटना घडली आहे. अपघातात मृत्यू झालेल्या मृतांची ओळख पटली आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये सोमनाथ रामचद्र वायसे, रामु संजीवन ( दोघे रा.नाझरे कप ता. पुरंदर) अजय कुमार चव्हाण (रा. उत्तरप्रदेश) अजित अशोक जाधव (रा. कांजळे, ता. भोर) किरण भारत राऊत (रा. पवारवाडी, ता. इंदापूर) अक्षय शंकर राऊत (रा. झारगडवाडी, ता.इंदापूर) अश्विनी शंकर ऐसार (रा.नागनसूर हेद्रे सोलापूर) यांचा समावेश आहे तर एका मृताची अजूनही ओळख पटू शकली नाही. या अपघातामध्ये दोन मुलांसह पाचजणही जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरी-मोरगाव रस्त्यावर जेजुरीकडून इंदापूरकडे एक कार चालली होती. ही कार किर्लोस्कर कंपनी जवळ आली त्यावेळी समोर असणाऱ्या श्रीराम हॉटेलबाहेर एका पीकअपमधून साहित्य उतरविण्याचे काम सुरू होते. कार चालकाला याचा अंदाज न आल्याने या कारने पीकअपला जोरदार धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की पिकअपमधून साहित्य खाली उतरविणारे कर्मचारी, हॉटेलचे मालक आणि कारमध्ये असणाऱ्या व्यक्ती अश्या 8 जणांचा यात जागीच मृत्यू झाला तर दोन मुले, एक महिला व दोन पुरुष असे पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.