दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)
राज्य राखीव पोलीस दलातील एका जवानाचे चोरट्याने भरदिवसा दीड लाख रुपये लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 7 मध्ये पोलीस नाईक पदावर कार्यरत असणारे धनाजी रामचंद्र साबळे (वय 33,रा. दत्त मंदिर, भिमनगर, दौंड) यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बँकेतून पैसे काढणाऱ्यांवर पाळत ठेवून त्यांना लुटण्याचे प्रमाण शहरात वाढत आहेत, या आधीही अशा लुटीच्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर येत आहे.
या घटनेबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रा. रा. पो. गट क्र. 7 येथे पोलीस नाईक पदावर कार्यरत असणारे धनाजी साबळे यांनी दि. 2 जाने. रोजी दु.1:30 वा. दरम्यान येथील महावितरण कार्यालया शेजारील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून त्यांच्या चुलत भावाच्या खात्यातून दिड लाख रुपयांची रक्कम काढली, व ती रक्कम एका कागदी पिशवी मध्ये ठेवली होती.
बँकेतून बाहेर आल्यावर त्यांनी ही पिशवी बँके बाहेर उभ्या केलेल्या आपल्या दुचाकीच्या हँडलला लटकवली. दरम्यान त्यांच्या मोबाईल फोनवर एक फोन आला, फोनवर बोलताना दुचाकी कडे पाठ करून ते बोलत राहिले, बोलणे झाल्यावर त्यांची नजर आपल्या दुचाकीच्या हँडल वर गेली असता त्या ठिकाणी लटकवलेली पैशाची पिशवी त्यांना दिसली नाही.
त्यामुळे त्यांनी बँकेच्या आजूबाजूला व परिसरात पिशवीचा शोध घेतला परंतु पैसे असलेली पिशवी त्यांना सापडली नाही. फोनवर बोलण्याच्या नादात असणाऱ्या साबळे यांची नजर चुकवून चोरट्याने आपला डाव साधला व दिड लाख रुपये असलेली पिशवी चोरून नेली. घटनेचा पुढील तपास या परिसराचे बीट अंमलदार तन्वीर सय्यद करीत आहेत.