Clean City – स्वच्छता अभियानासाठी केडगावकर उतरले रस्त्यावर



दौंड : सहकारनामा 

स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारकडून राष्ट्रीय स्तरावर राबविले जाते. सरकारच्या याच योजनेला पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि आपला गाव,आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आज केडगावकर आपला बहुमोल वेळ देऊन रस्त्यावर उतरले आहेत.

स्वच्छता हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे आपल्या परिसरातील घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी आज सकाळीच केडगावमधील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच, ग्राप सदस्य, परिषद सदस्य, डॉक्टर, व्यापारी, नोकरदार मंडळी आणि ग्रामस्थ यांनी केडगाव येथील ओढ्यात उतरून त्याची साफ सफाई सुरू केली आहे.

केडगाव येथे मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. जवळ असणाऱ्या अनेक सदनिकांमधून हा जमलेला सर्व कचरा येथील ओढ्यात टाकण्यात येत असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत होती. या सर्व प्रकारामुळे येथील नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत होती.

या सर्व प्रकाराचा आढावा घेऊन वरील सर्व नागरिकांनी हा ओढा स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला आणि आज रविवारी सकाळी याची सुरुवातही झाली. जवळपास शंभर ते दीडशे नागरिकांनी एकत्र येत हा उपक्रम राबवला असून काही तासांत येथील कचरा आणि दुर्गंधी नष्ट होऊन सर्व परिसर स्वच्छ दिसू लागला आहे त्यामुळे आता येथील ग्रामस्थांकडून या कामाचे कौतुक केले जात आहे.