अख्तर काझी
दौंड : लवकर फोटो तयार केले नाही या कारणावरून दोन युवकांनी फोटो स्टुडिओमध्ये येऊन फोटोग्राफी करणाऱ्या कर्मचाऱ्यास लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना दौंड शहरातील हरी ओम फोटो स्टुडिओ मध्ये घडली आहे. मारहाण करतानाची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या प्रकरणी श्रीकांत अनिल घोडके (रा.भीम नगर, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिसांनी दोन युवकांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक 11 जून रोजी दुपारी 1:15 च्या दरम्यान दौंड पोलीस स्टेशन मागील हरी ओम फोटो स्टुडिओ येथे घडली. आरोपी युवक फोटो स्टुडिओमध्ये आला व त्याने फोटो तयार झाले आहेत का असे विचारले, फिर्यादी यांनी फोटो तयार झाले नाहीत तयार करून देतो असे म्हटले. फोटो तयार झाले नाहीत हे पाहून आरोपीने फिर्यादी यांना शिवीगाळ व दमदाटी केली. येथे ग्राहक आहेत, आरडा ओरडा करू नको असे आरोपीस सांगितले असता त्याने आपल्या भावाला बोलावून घेतले.
दोघांनी फिर्यादी यांना मारहाण केली, डोक्यात लाकडी दांडके मारून जखमी केले. तू जेथे राहतो तेथे येऊन तुला मारीन अशी धमकी देत आरोपी तेथून निघून गेले. मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असल्याने आरोपींची ओळख पटली असून त्यांच्या अटकेची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे अशी माहिती राहुल घाडगे यांनी दिली.