उरुळी कांचन येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न, 166 रक्तदात्यांचा सहभाग



लोणीकाळभोर : सहकारनामा (हनुमंत चिकणे)

हवेली तालुक्यातील उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप यांच्या सहाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ड्रीम युवा सोशल फाऊंडेशन व प्रादेशिक रक्तपेढी ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम महात्मा गांधी महाविद्यालयातील रवींद्र कला मंदिर सभागृहात आज रविवार दि.०३ जानेवारी रोजी पार पडला.

या रक्तदान शिबिरात १६६ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. यात १५४ पुरुष व १२ महिलांचा समावेश होता. प्रत्येक रक्तदात्यास पर्यावरण पूरक तुळशीचे रोप, मास्क, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या शिबीराचे उदघाटन पुणे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा समन्वयक सुनील जगताप यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्त्या छाया महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. मणीभाई देसाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्रादेसिक रक्तपेढी ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे येथील समाजसेवा अधिक्षक गणेश बर्डे (वैद्यकीय), डॉ. सौरभ कुसुरकर (रक्त संकलन अधिकारी) ससून पुणे, हवेली तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष जयदीप जाधव, माजी सचिव अमोल भोसले, उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे संतोष चौधरी, किरण वांजे, शांताराम चौधरी, महादेव काकडे, मनोज महाडीक, शैलेश गायकवाड, शैलेश बाबर, सोमनाथ बगाडे, शिवाजी नवगिरे आदि मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, उरुळी कांचन मध्ये हा ग्राम स्वच्छता अभियान ग्रुप गेल्या सहा वर्षापासून उरुळी कांचन व परिसरात पर्यावरण रक्षणासाठी ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवत आहेत. सुमारे शंभर कार्यकर्त्यांचा हा ग्रुप कार्यरत आहे, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या दरम्यान उरुळी कांचन गावातून पालखी निघून गेल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात या ग्रुपने संपूर्ण गावाची स्वच्छता करून एक आदर्शवत काम गेल्या सहा वर्षापासून करीत आहेत. यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून रक्तदान करण्याचे अवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला ऊरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उस्फूर्त प्रतिसाद दिला.